दानवे-सत्तार यांची ‘डिनर डिप्लोमसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:04 AM2021-09-18T04:04:22+5:302021-09-18T04:04:22+5:30

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जर-तरच्या राजकारणातून आजी-माजी हे भावी सहकारी होण्याचे विधान काय केले, केंद्रीय रेल्वेमंत्री ...

Danve-Sattar's 'Dinner Diplomacy' | दानवे-सत्तार यांची ‘डिनर डिप्लोमसी’

दानवे-सत्तार यांची ‘डिनर डिप्लोमसी’

googlenewsNext

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जर-तरच्या राजकारणातून आजी-माजी हे भावी सहकारी होण्याचे विधान काय केले, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जुने राजकीय मतभेद विसरत सोबत जेवण केले. तसेच शिवसेना-भाजप युती होण्यासाठी अनुकूलता निर्माण करण्याचा ’विडा’देखील उचलल्याचे समजते. दोघांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’ची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राज्यमंत्री सत्तार आणि रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्यात नोटबंदीनंतर फारसे सख्य राहिलेले नव्हते. नंतर पुढे विधानसभा निवडणुकीतही या दोघांनी एकमेकांच्या विरोधात प्रचार केला. आरोप-प्रत्यारोपातून चर्चेत राहिलेले हे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत देणारे वक्तव्य करताच १८ महिन्यांनी दानवे यांच्या घरी एकत्र आले, तेथेच दोघांनी जेवण घेतले. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत शिवसेना-भाजपा युती होण्याबाबत अनुकूलता दर्शविली. मात्र या मुलाखतीत सिल्लोड-जालना लोकसभा मतदारसंघातील राजकारणावरच उभयंतांनी जास्त चर्चा केली. एकमेकांची उणी-दुणीही त्यांनी काढली. राज्यमंत्री सत्तार हे पुढच्या निवडणुकीत माझा प्रचार करतील, असे भाकितही राज्यमंत्री दानवे यांनी करून खळबळ उडवून दिली.

दानवे म्हणाले, सत्तार मध्यस्थी करतील

दानवे म्हणाले, युतीसाठी महसूल राज्यमंत्री सत्तार हे मध्यस्थी करतील. त्यांनी मध्यस्थी केली तर पुढे जाऊ. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कानात काय सांगितले, हे सगळेच जाहीर करायचे नसते. शिवसेना आणि भाजप समविचारी पक्ष आहेत. दोन्ही पक्षांचा एकच मतदार आहे. जनतेने दोन्ही पक्षांना निवडून दिले होते. आमचे सरकार बनावे अशी जनतेची इच्छा होती. त्यामुळे आताचे राज्य सरकार हे जनतेचे नाही. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर वातावरण तयार होईल. चर्चा होतील, जनतेचा दबाव वाढल्यांनतर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ युतीबाबत निर्णय घेतील. युतीसाठी किमान-समान कार्यक्रम ठरेल. मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा झाल्यास मला आनंदच होईल.

सत्तार म्हणाले, मी मध्यस्थीसाठी तयार

राज्यमंमत्री सत्तार म्हणाले, दोन्ही पक्षांची युती होण्यासाठी वेळ आली तर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे. राज्यमंत्री दानवे यांनी नाश्त्यासाठी बोलावले होते. त्यामुळे मी येथे आलो. मुख्यमंत्री त्यांना कानात काय बोलले हे त्यांनाच माहिती असेल. आगामी काळात युती झाली तर माझ्या डोक्यावरची टोपी उतरेल. असा तुम्ही पण केला आहे. यावर सत्तार यांनी बोलणे टाळत युती होण्याची जनतेची इच्छा असल्याचे नमूद केले. पक्षप्रमुखांनी युतीचा निर्णय घेतला तर राज्यातील सर्व शिवसैनिकांना तो मान्य असेल. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आम्ही कंटाळलेलो नाहीत. पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी पुढील तीन वर्ष ठाकरे यांना मुख्यमंत्री जाहीर करून युती करावी.

स्थानिकांच्या पोटात गोळा

शिवसेनेची भूमिका थेट सत्तार यांनी मांडल्यामुळे स्थानिक नेत्यांच्या पोटात गोळा उठला. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून सत्तार शिवसेनेत आले, मंत्री झाले. आणि आता पक्षाच्या धोरणात्मक मुद्यांवर थेट भूमिका मांडू लागल्यामुळे स्थानिक शिवसेना नेत्यांच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे.

Web Title: Danve-Sattar's 'Dinner Diplomacy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.