जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत कोसळली दरड; कुठलीही हानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 06:16 PM2021-08-19T18:16:30+5:302021-08-19T18:17:55+5:30
Rain In Aurangabad : मंगळवारी (दि.१७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अजिंठालेणी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली.
सोयगाव ( औरंगाबाद ) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत ( Ajintha Caves ) दरड कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. बुधवार (दि.१८) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने लेणी क्रमांक ७ समोर कोसळलेले दगड बाजूला काढले. या संपूर्ण घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसून आले. सुदैवाने दरड कोसळण्याची घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ( Darad collapsed in the world famous Ajanta Caves; No harm done )
अजिंठा लेणी डोंगराच्या मध्यभागी कोरलेली आहे. परिणामी, पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरील मुरुम व मोठमोठे दगड ठिसूळ होऊन लहानमोठ्या दरडी थेट अजिंठालेणीत कोसळण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून अशा घटनांबाबत नेहमीच कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याचे आढळून येते. दरम्यान, विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी (दि.१७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अजिंठालेणी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुरु झालेला हा पाऊस सुमारे तीन ते चार तास बरसला. या सततधार पावसामुळे अजिंठालेणी डोंगर माथ्यावरील एक दरड ठिसूळ होवून रात्री उशिरा अजिंठालेणीत कोसळली. या दरडीतील काही दगड लेणी क्रमांक- ७ समोरील रस्त्यावर कोसळल्या. त्यापुढील लेण्यांकडे जाणारा मार्ग बंद झाला. बुधवारी (दि.१८) सकाळी ही घटना उघडकीस आली. भारतीय पुरातत्त्व विभागाने अत्यंत तत्परतेने दगड बाजूला काढून पर्यटकांना अजिंठालेणी बघण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला.
दरड कोसळण्यावर उपाययोजना हव्यात
११ जून २०२० मध्ये दरड कोसळून लेणी क्रमांक २० व २१ या दोन लेण्यांना जोडणारा पुल तुटला होता. सुदैवाने त्यावेळी ही दरड रात्रीच्या वेळी कोसळल्याने व लॉकडाऊनमुळे लेणी बंद असल्याने जिवीतहानी झाली नव्हती. त्यानंतर आता पुन्हा मंगळवारी (दि.१७) च्या रात्री लेणी क्रमांक ७ समोर दरड कोसळण्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत ही कोणतीही जीवितहानी झाली नसलीतरी या घटनेवरुन अजिंठालेणीत दरडीत कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटना रोखण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाला सतत अपयश येतांना दिसत आहे. ही बाब जागतिक वारसास्थळ असलेल्या लेणीच्या जतन,संरक्षण व संवर्धानाच्या दृष्टीने घातक ठरु शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.