नाल्यात पाच मजली इमारत उभारण्याचे धाडस; महापालिकेने २२ कॉलम केले उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:12 PM2022-01-01T17:12:21+5:302022-01-01T17:14:57+5:30
शहानूरवाडीत अतिक्रमण हटाव विभागाची कारवाई
औरंगाबाद : शहानूरवाडी येथे नाल्यात मोठमोठे कॉलम बांधून तब्बल पाच मजली इमारत उभारण्याचे काम सुरू झाले होते. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी सकाळी तब्बल २२ कॉलम जमीनदोस्त केले. विशेष म्हणजे हे अवाढव्य अवैध बांधकाम मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना दोन दिवसांपूर्वी या भागात गेल्यावर निदर्शनास आले होते. अतिक्रमण हटाव विभागाच्या इमारत निरीक्षकांना या बांधकामाचा थांगपत्ताही नव्हता.
शहरात अवैध बांधकाम रोखण्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटाव विभागात इमारत निरीक्षक नेमले आहेत. हे निरीक्षक आपल्या हद्दीत कोणते अवैध बांधकाम सुरू आहे, याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांना दिवसभर टार्गेट करतात. दोन दिवसांपूर्वी प्रशासक पाण्डेय शहानूरवाडी भागात गेले होते. तेथे नाल्यात त्यांना २० बाय १५० या आकाराचे अवैध बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. प्रशासक यांनी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी मनपाचे अतिक्रमण हटाव पथक दाखल झाले.
नाल्यात गुरुवारीच २२ कॉलम सिमेंटने भरण्यात आले होते. कॉलमचा आकार बघून मनपा कर्मचारीही अवाक झाले होते. किमान ५ मजली इमारत उभारण्यासाठी एवढे मोठे कॉलम तयार करण्यात येत होते. जेसीबीच्या साह्याने सर्व कॉलम तोडण्यात आले. लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले. अंजय्या नामक व्यक्ती हा बांधकाम करीत असल्याचे आसपासच्या नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांना सांगितले.
जवळपास २ कोटींची जागा
शहानुरमियाँ दर्गा परिसरात महापालिकेने कारवाई केली. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने २० बाय १५० म्हणजेच ३ हजार चौरस फुट नाल्यात अतिक्रमण केले होते. या जागेची किमंत जवळपास बाजारभावानुसार २ कोटींपेक्षा अधिक आहे. संबधितावर फौजदारी कारवाई करण्यासाठी महापालिकेने अधिक माहिती मिळविण्या सुरूवात केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.