शिवसेनेत पक्षनिष्ठेला तडा देण्याचे धाडस; आमदारांना आपलेसे करण्याचा असा आहे 'शिंदे पॅटर्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:57 AM2022-06-22T11:57:49+5:302022-06-22T12:01:25+5:30
मराठवाड्यातील १२ पैक्की ७ आमदार शिंदे सोबत; ५०० कोटींहून अधिक कामे दिल्याने सगळेच समर्थक
औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेचे विधानसभेवर निवडून गेलेल्या सगळ्या आमदारांना गडगंज निधी देऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपलेसे केले. त्या विकासनिधीची परतफेड म्हणून जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी शिंदे यांना समर्थन देत पक्षनिष्ठेला तडा दिला. ५०० कोटींहून अधिकचा निधी सहा मतदारसंघात त्यांनी दिला. मराठवाड्यातील शिवसेनेच्या १२ पैकी ७ आमदारांनी शिंदे यांना समर्थन दिल्याचे चित्र सध्या आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ५, उस्मानाबादमधील १ आणि नांदेड जिल्ह्यातील एका आमदाराचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल, पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट हे मंगळवारी सकाळपासून ‘नॉट रिचेबल‘ आहेत. यातील कितीजण मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. शिंदे यांनी सिल्लोड मतदारसंघात २०० कोटींहून अधिकचा निधी विकासकामांसाठी दिला. कन्नड मतदारसंघात ५०, तर वैजापूरमध्ये २५ कोटींहून अधिकचा निधी विविध कामांसाठी दिला. विशेष म्हणजे या कामांच्या उद्घाटनासाठी शिंदे हे हेलिकाॅप्टरने आले होते. पश्चिम मतदारसंघात ६० कोटींहून अधिकची कामे शिंदे यांनी दिलेल्या विकास निधीतून झालेली आहेत. याशिवाय शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना १० कोटींच्या आसपास निधी दिला. मध्य मतदारसंघासह विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनाही ५० कोटींच्या आसपास निधी दिल्याचे बोलले जात आहे. पैठण मतदारसंघातही काही कामे शिंदे यांच्या निधीतून झाली.
काही काळ पालकमंत्री राहिले शिंदे
एकनाथ शिंदे हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील काही काळ होते. डॉ. दीपक सांवत यांचा विधान परिषदेवरील कार्यकाळ संपल्यानंतर शिंदे यांच्यावर प्रभारी पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या काळातही त्यांनी जिल्हा परिषदेतील रस्त्यांच्या कामांना ब्रेक लावला होता. त्यावरून डीपीसीच्या बैठकीत वाद झाला होता. २०१९ च्या निवडणुकीपर्यंत शिंदे पालकमंत्री होते. त्याचकाळात शिवसेनेतील अनेकांची शिंदे यांच्याशी सलगी वाढली.