समृद्धी महामार्गावर भलतेच धाडस; हातात पिस्तूल घेऊन गावगुंडांनी बनवले रील्स
By सुमित डोळे | Published: July 16, 2024 07:53 PM2024-07-16T19:53:42+5:302024-07-16T19:53:42+5:30
जिन्सीतील पाच गावगुंडांना इन्स्टाग्राम रील नडले, घेऊन गेले थेट तुरुंगात
छत्रपती संभाजीनगर : डोक्यात भाईगिरीची हवा, दोघांच्या हातात पिस्तूल, मागे सोबतचे दहा ते बारा टवाळखोर अन् बॅकग्राऊंडला धमक्यांचे बोल असलले गाणे... सुसाट वाहने वाहणाऱ्या समृध्दी महामार्गावर वाहने उभी करून १६ टवाळखोरांनी असे रील तयार केले. मात्र, पोलिसांपर्यंत हे रील पोहोचले. बारा तासांमध्ये पिस्तुलाऐवजी हातात बेड्या पडून पाच जणांची तुरूंगात रवानगी झाली. मंगळवारी गुन्हे शाखेने जिन्सी भागात ही कारवाई केली.
शेख हमीद शेख हबीब, शेख अफताब शेख कादर, शेख आशपाक शेख कादर (तिघेही रा. रेंगटीपुरा, जिन्सी), आदिल तंबोली ऐजाज (रा. तेलंग वस्ती, जिन्सी) व सुमित सुभाष अवलकर (रा. संजयनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी हमीद व अन्य आरोपींचे हे रील पोलिसांपर्यंत पोहोचले. उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी तातडीने अटकेच्या सूचना केल्या. निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी गुप्तपणे रीलमधील टवाळखोरांची माहिती मिळवली. त्यानंतर सोमवारी रात्री ८ वाजेनंतर त्यांच्या घरी छापे टाकण्यात आले. अंमलदार परभत म्हस्के, विजय भानुसे, मनोहर गिते, संतोष भानुसे, ज्ञानेश्वर पवार यांनी मध्यरात्रीपर्यंत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या.
आधी पिस्तूल लपवले
रील पोलिसांपर्यंत पोहोचल्याची बाब हमीदला कळाली होती. त्यामुळे दोघांच्या हातातील दोन्ही पिस्तुले त्याने आधीच गायब केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पिस्तुलासह त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे दौलताबादचे उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांनी सांगितले.
रस्त्यावर दुचाकी उभ्या केल्या
हमीद, अफताबसह एकूण १६ जणांनी मिळून समृध्दी महामार्गावर हे रील तयार केले. यात रस्त्याच्या मधोमध मोपेड दुचाकी उभ्या करुन रस्ता व्यापून ते गाण्याच्या तालावर चालत आहेत. यातील हबीबवर सिटी चौक, क्रांती चौक व सिडको ठाण्यात मारहाणीचे ३ तर हमीदवर दौलताबादमध्ये एक गुन्हा दाखल आहे.