देवळाई रोडवर धाडसी चोरी; सुरक्षारक्षकाला गुप्तीचा धाक दाखवून फोडले शिक्षक दांपत्याचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 04:53 PM2020-09-08T16:53:51+5:302020-09-08T16:57:46+5:30
सोसायटीच्या मागील वॉल कंपाउंडवरुन उड्या घेऊन पाच जण घुसले
औरंगाबाद: देवळाई रोडवरील मनजीत प्राईड ग्लोरी या वसाहतीच्या वॉचमनला गुप्तीचा धाक दाखवून पाच चोरट्यानी शिक्षक दांपत्याचा फ्लॅट फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केले. ही धाडसी चोरी सोमवारी रात्री दोन ते अडिच वाजेच्या सुमारास झाली. घटनेची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्राप्त माहिती अशी की , मनजीत प्राईड सोसायटीतील रहिवासी राजेंद्र रविंद्र बसवे आणि योगिता बसवे हे दांपत्य शिक्षक आहे. सोसायटीच्या सुरक्षेसाठी चोहोबाजूंनी वॉल कंपाउंड आणि जाळी लावली आहे. मुख्य गेटमधून सर्वाना प्रवेश असतो. या गेटवर २४ तांस सुरक्षारक्षक बसलेला असतो. शिवाय एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत रहिवास्याने त्याच्या कारच्या सुरक्षेसाठी राऊत नावाचा स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमलेला आहे .
बसवे यांची १८ वर्षीय मुलगी नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या नातेवाईकांकडे गेली होती. तिला आणण्यासाठी आणि नातेवाईकांचा भेटण्यासाठी बसवे दांपत्य सोमवारी दुपारी फ्लॅटला कुलूप लावून नंदनवन कॉलनीत गेले होते. सोमवारी रात्री २ ते २:३० वाजेच्या सुमारास सोसायटीच्या मागील वॉल कंपाउंडवरुन उड्या घेऊन पाच जण घुसल्याचे वॉचमन राऊत यांनी पाहिले. यानंतर ते तेथून मुख्य गेटवरील सुरक्षारक्षक समुद्रेवार यांना ही बाब सांगितली.
यानंतर राऊत त्याच्या मालकाच्या कारजवळ जाऊन बसला. तर समुद्रेवार सोसायटीच्या मागील बाजूला गेले. असता टेहळणी करणाऱ्या दोन चोरट्यानी त्यांना गुप्तीचा धाक दाखविला आणि शांत बसा नाहीतर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या समुद्रेवार हे तेथेच बसले. काही वेळाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील तीन चोरटे बसवे यांचे फ्लॅट फोडून किमती ऐवज चोरी करून खाली आले. यानंतर सर्व चोरटे एकत्रित आल्यामार्गाने पसार झाले. या घटनेनंतर समुद्रेवार यांनी आरडाओरड करीत रहिवाशांना बोलावले . तेव्हा चोरट्यानी बसवे दांपत्याचे घर फोडल्याचे समजले. बसवे यांचा भाऊ त्यांच्या फ्लॅटच्या वरच्या मजल्यांवर राहतो. त्यांनी आणि रहिवाश्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. रात्रपाळीच्या गस्तीवरील सातारा पोलीस आणि गुन्हेशाखेचे सहायक पोलीस निरिक्षक अजबसिंग जारवाल , शिवाजी झिने , प्रकाश चव्हाण, राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चोरांचा शोध घेतला मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही.
दीड लाखाचा ऐवज लंपास
राजेंद्र रवींद्र बसवे यांनी घरी येऊन पाहणी केली. चोरट्यानी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे तीन जोडी कानातील, नथ, मंगळसूत्र पेंडल आणि सुमारे 25 ते 30 हजार रोख असा एकूण दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याचे दिसले. यानंतर त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली.