गाढेजळगाव शिवारात धाडसी चोरी, शेतकऱ्याची कांदे विकलेली रोकड अन् दागिने पळवले

By साहेबराव हिवराळे | Published: October 23, 2023 04:04 PM2023-10-23T16:04:52+5:302023-10-23T16:05:22+5:30

चोरट्यांनी एकूण तीन लाखांचा ऐवज लांपास केला

Daring theft in Gadhjalgaon Shivara, cash and jewelery stolen from farmer's sold onions | गाढेजळगाव शिवारात धाडसी चोरी, शेतकऱ्याची कांदे विकलेली रोकड अन् दागिने पळवले

गाढेजळगाव शिवारात धाडसी चोरी, शेतकऱ्याची कांदे विकलेली रोकड अन् दागिने पळवले

करमाड : जालना रोडलगत असलेल्या गाढेजळगावातील शेतवस्तीत असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख ८० हजार रुपये असा एकूण तीन लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना शुक्रवारी (दि.२०) रोजी रात्री ११ वाजता घडली.

गाढेजळगाव शिवारातील गट क्र.३७४ मध्ये कल्याण निवृत्ती सादरे हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. सध्या नवरात्रीचा उत्सव असल्याने त्यांची पत्नी जिजाबाई कल्याण सादरे या गेल्या सात दिवसांपासून याच परिसरातील रेणुका देवी (डोंगरची आई) मंदिरात देवीची सेवा करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे कल्याण सादरे व मुलगा दीपक हे दोघेच शेतात होते. शुक्रवारी (दि.२०) रोजी रात्री दीपक हा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. रात्री साडेअकरा वाजता घरी आला त्यावेळी घरासमोर त्याला अनोळखी माणूस दिसल्याने त्याला हटकले असता त्याच्यावर लोखंडी पाइपने वार केला. परंतु प्रसंगावधान राखून दीपकने तो वार चुकवला. पण, दुसऱ्या चोरट्याने दीपकला लोखंडी टाॅमी फेकून मारली. ती टाॅमी दीपकच्या डोक्यात लागली. दीपकने आरडाओरड केला असता घराबाहेर झोपलेल्या वडिलांना जाग आली. शेतवस्तीवर आरडाओरड करण्याचा आवाज येत असल्याने जवळच शेतवस्तीवर राहत असलेले विठ्ठल सादरे, लखन सादरे, नकुल ढोले हे कल्याण सादरे यांच्या शेतवस्तीवर आले. आजूबाजूच्या शेतवस्तीवरील शेतकरीही जागे झाल्याचे पाहून चोरटे चोरी करून अंधाराचा फायदा घेत पळाले.

यावेळी घरातील दरवाजाच्या मागे एका पिशवीत लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने व दोन दिवसांपूर्वी कांदे विकून आणलेले नगदी ८० हजार रुपये घरात ठेवले होते ते सुद्धा चोरट्यांनी चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले होते. परंतु श्वान हे घटनास्थळावरून बाजूला असलेल्या शेताजवळील नाल्यापर्यंत गेले. परत ते जालना महामार्गापर्यंत आले व तेथेच घुटमळल्यामुळे पोलिसांना या चोरीचा सुगावा लागला नाही. यावेळी पोलिसांनी ठसे तज्ज्ञांची मदत घेतली. परंतु फायदा होऊ शकला नाही.

यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, करमाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, विठ्ठल चव्हाण, गणेश कांबळे, सुनील लहाने करीत आहेत.

Web Title: Daring theft in Gadhjalgaon Shivara, cash and jewelery stolen from farmer's sold onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.