इव्हेंटमधील लेझर लाइट पायलटच्या डोळ्यांत गेल्याने काहीकाळ अंधारी; फुगे, राॅकेटनेही धोका
By संतोष हिरेमठ | Published: July 15, 2023 03:48 PM2023-07-15T15:48:05+5:302023-07-15T15:48:55+5:30
विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर; धावपट्टीच्या साडेनऊ कि. मी. परिसरातील लाॅन्स, व्यावसायिक, मालमत्ताधारकांना नोटीस
छत्रपती संभाजीनगर : लग्नसोहळा, समारंभ आणि वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये लेझर लाइट, फुगे सोडणे, आतषबाजीसाठी राॅकेट उडविण्याचा प्रकार होतो. या अशाच प्रकारामुळे काही काळापूर्वी चिकलठाणा विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या पायलटच्या डोळ्यात लेझर लाइट जाऊन काही वेळेसाठी डोळ्यापुढे अंधार आल्याचा प्रकारही घडला. त्यातून अपघाताचा धोका असल्याने या कारणाने विमान प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, धावपट्टीच्या साडेनऊ कि. मी. परिसरातील लाॅन, विविध व्यावसायिक आणि मालमत्ताधारकांना याविषयी नोटीस बजावण्यात येत आहे.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूने शहर आहे. विमानतळापासून काही अंतरावरच इमारतींवर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठे फुगे लावण्यात येत आहेत. आतषबाजीसाठी दिवाळीत उडविण्यात येणारी राॅकेट आता कधीही उडविण्याचा प्रकार होत आहे. तर छायाचित्र, व्हिडीओ आणि रिल्ससाठी ड्रोन उडविण्याचा प्रकार होत आहे. ही बाब विमानतळ प्राधिकरणाकडून गांभीर्याने घेत परिसरातील मालमत्ताधारकांना नियमांचे पालन करण्यासंदर्भात नोटीस देण्यात येत आहेत. विमानतळ प्राधिकरणाची परवानगी न घेता या बाबी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
किती किमी परिसर लेझर बीम फ्री फाइट झोन?
चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीच्या पूर्व ते पश्चिम दिशेला साडेनऊ कि. मी. आणि धावपट्टीच्या उत्तर ते दक्षिण दिशेला साडेतीन कि. मी. परिसर लेझर बीम फ्री फाइट झोन करण्यात आला आहे.
परवानगी आवश्यक
विमानांची, प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची ‘एटीसी’चे सहायक व्यवस्थापक राहुल साहू म्हणाले, अनेक इव्हेंटमध्ये लेझर लाइटचा वापर केला जातो. हा लेझर लाइट एका वैमानिकाच्या डोळ्यात जाण्याचा आणि त्यातून काही वेळासाठी वैमानिकाला अंधत्व येण्याचा प्रकार यापूर्वी आपल्याकडे झाला आहे. त्यामुळे लेझर लाइटचा वापर करताना परवानगी घेणे आवश्यक आहे.
परवानगी घ्यावी
झाल्टा, सुंदरवाडी ते गारखेडा परिसरापर्यंत विमानांच्या उड्डाणाच्या वेळेत लेझर लाइट, राॅकेटसारखे फटाके, फुग्यांचा वापर विनापरवानगी करता कामा नये. त्यासाठी विमानतळावरील ‘एटीसी’ची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी वापर केल्यास कारवाई केली जाईल. विमानांची ये-जा करण्याची वेळ सोडून इतर वेळेत या बाबींसाठी परवानगी दिली जाते.
- विनायक कटके, सहायक महाव्यवस्थापक, एटीसी
विमानतळावरून रोज टेक ऑफ घेणारी विमाने - ८
विमानतळावर दररोज उतरणारी विमाने - ८