बहिरगावकरांच्या सामाजिक बांधिलकीचे घडले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:05 AM2021-07-08T04:05:17+5:302021-07-08T04:05:17+5:30
कन्नड : शासकीय कर्मचारी म्हटला की, सहसा त्यांच्याबद्दल समाजात फारशी आदराची भावना असलेच असे नाही. मात्र, कर्तव्य पार पाडीत ...
कन्नड : शासकीय कर्मचारी म्हटला की, सहसा त्यांच्याबद्दल समाजात फारशी आदराची भावना असलेच असे नाही. मात्र, कर्तव्य पार पाडीत असताना, कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा ठेवला, तर संकटात समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो. याचे उदाहरण दाखवून दिले, ते तालुक्यातील आदर्श बहिरगावच्या ग्रामस्थांनी शॉक लागून मृत्यू झालेल्या वायरमनच्या कुटुंबीयांना बहिरगाववासीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासत दोन लाखांची आर्थिक मदत केली.
अतिशय मनमिळावू कार्यतत्पर व प्रामाणिकपणे बहिरगाव येथे कार्यरत असलेले महावितरणचे वायरमन नवनाथ शंकर चव्हाण (३५) यांचा २५ जून रोजी शॉक लागल्याने मृत्यू झाला. सेवा बजावताना जात, धर्म, नातेवाईक न बघता, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य केल्याने, या भागातील नागरिकांच्या मनात त्यांच्या बद्दल आदराची भावना निर्माण झाली होती. बहिरगाव ग्रामस्थांनी २ लाख १४ हजार १०० रुपयांची लोकवर्गणी गोळा केली. ही आर्थिक मदत वायरमन चव्हाण यांचा मुलगा व मुलीच्या नावाने बँकेत एफडी करण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र चव्हाण यांच्या पत्नीकडे सुपुर्द करण्यात करण्यात आले. यावेळी उपसरपंच नामदेव दापके, सेवानिवृत्त महावितरणचे कार्यकारी अभियंता भगवान पगारे, शाखा अभियंता योगेश चेंदके, कृषिभूषण संतोष जाधव, भारत दापके, राहुल पवार, वाल्मिक शिरसे, राजू राऊत, ग्रामसेवक योगेश धाडबळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
---
आदर्श बहिरगाव म्हणजे तालुक्यातील शेती व गांव समृद्धी चळवळीचे गांव आहे. मयत वायरमन चव्हाण यांनी कोणत्याही शेतकऱ्यास किंवा गावातील नागरिकास वीजपूरवठ्याबाबत अडचण येऊ दिली नाही. त्यांच्या कुटुंबास शासकीय मदत मिळण्याची वाट न पाहता, ग्रामस्थांनी एकत्र येत मदतीचा छोटासा प्रयत्न केला.
- नामदेव दापके, उपसरपंच, बहिरगाव
070721\img-20210706-wa0034.jpg
कुटुंबियांकडे मुदत ठेवीचा चेक देताना बहिरगाव वासीय