गडावर पुन्हा राजकीय दरीचे ‘दर्शन’
By Admin | Published: March 20, 2016 11:54 PM2016-03-20T23:54:14+5:302016-03-21T00:22:40+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांच्या पुढाकारातून रविवारी नारायणगडावर आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहिले.
व्यंकटेश वैष्णव , बीड
शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांच्या पुढाकारातून रविवारी नारायणगडावर आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहिले. पाठोपाठ भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील पाठ फिरवली. त्यामुळे उपस्थितांना राजकीय दरीचे दर्शन झाले.
आ. मेटे व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय मतभेदाची चर्चा नेहमीच होते त्याला वारंवार पुष्टी मिळू लागली आहे. पालकमंत्री मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे या दोघींचीही कार्यक्रमास अनुपस्थिती होती. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे ही गैरहजर राहिले. महत्त्वाचे म्हणजे भाजपचा एकही आमदार कार्यक्रमाकडे फिरकला नाही. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पत्रिकेत नाव नसताना ऐनवेळी हजेरी लावली; परंतु त्यांच्या दिमतीला भाजपचा एकही कार्यकर्ता दिसून आला नाही. एरव्ही भाजपचा कुठलाही नेता जिल्ह्यात आला तर कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या भोवती गराडा घालतात. पण पत्रिकेत नाव असताना भाजप पदाधिकारी कार्यक्रमापासून अलिप्त राहिले. याचीच चर्चा कार्यक्रमस्थळी होती.
मेटेंना आवरला नाही मोह !
गडावरून राजकीय समीकरणे जुळविण्याचा अनुभव जिल्ह्याला नवा नाही. मेटे यांनी देखील नारायणगडावर आयोजित कार्यक्रम हा राजकीय नसल्याचे भाषणाच्या सुरूवातीला केले. मात्र, राजकीय टिप्पणी करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. कोणाला भगवानगडावरून तर कोणाला गोपीनाथगडावरून दिल्ली, मुंबई दिसते असा टोला लगावत, भगवानगडाचा आशीर्वाद घेऊन अनेकजण आमदार, खासदार झाले. मात्र, त्याच्या जोडीला नारायणगडाचाही आशीर्वाद होता, अशी आठवण त्यांनी करून दिली.
नगदनारायणाची सेवा करणाऱ्यांना ‘नगद’ प्रसाद मिळतो. मात्र, गडाजवळ राहणाऱ्यांना विसर पडल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला.