एकाच शिवलिंगात १०८ विश्वेश्वराचे दर्शन; मंदिरात राजस्थानी वास्तुशैलीची झलक
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 14, 2023 05:36 PM2023-09-14T17:36:08+5:302023-09-14T17:40:02+5:30
विश्वेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग असे आहे की, त्या एकाच शिवलिंगात १०८ लहान-लहान पिंडी आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहरात ११७ महादेव मंदिरे आहेत. तिथे एकाच शिवलिंगाचे दर्शन होते. मात्र, जयविश्व भारती कॉलनीतील विश्वेश्वर महादेव मंदिरात एका शिवलिंगाचे दर्शन घेतले तर तिथेच १०८ विश्वेश्वराचे दर्शन घडते. यामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
जवाहर कॉलनी चेतक घोड्याच्या पश्चिम बाजूचा परिसर म्हणजे जयविश्वभारती कॉलनी होय. या कॉलनीत मध्यभागी रिकाम्या जागेवर विश्वेश्वर महादेव मंदिर २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आले. हे शिवलिंग जयपूर येथून आणण्यात आले होते. येथील विश्वेश्वराचे शिवलिंग नावीन्यपूर्ण ठरत आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिराचा आकार वाढविण्यात आला आहे. गाभाऱ्यासमोर एक ४० बाय ७० फुटांचे सभागृह बांधण्यात आले. याची उंची १६ फूट उंच आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यात राजस्थानी बांधकाम शैलीची झलक दिसते. श्रावणी सोमवारी शिवलिंगाला विविध फुलांची सजावट करण्यात येते. तसेच भव्य रांगोळी काढण्यात येत असते. या रांगोळीत जे शिवलिंग ठेवले जाते, त्याच्याभोवती १००८ रुद्राक्षांची माळ लावली जाते. या मंदिराच्या विकासासाठी विश्वेश्वर विकास मंडळ स्थापन करण्यात आले आहे.
विश्वेश्वराचे काय आहे वैशिष्ट्य ?
विश्वेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग असे आहे की, त्या एकाच शिवलिंगात १०८ लहान-लहान पिंडी आहेत. म्हणजे एकाच विश्वेश्वराचे दर्शन घेतले तर १०८ शिवलिंगांचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते. अशा प्रकारचे हे शहरातील एकमेव मंदिर आहे.