ब्रह्मवृंदा अभावी ‘दशक्रिया’ ठप्प; पैठण येथे ब्राह्मण समाजातर्फे ‘दशक्रिया’ चित्रपटाविरोधात मूकमोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 06:38 PM2017-11-17T18:38:57+5:302017-11-17T18:43:23+5:30
‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीसाठी शुक्रवारी ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली.
पैठण : ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीसाठी शुक्रवारी ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, मोक्षघाटावर दशक्रिया विधी करण्यासाठी एकही ब्राह्मण वा पुरोहित हजर नसल्याने दशक्रिया विधीसाठी आलेल्या हजारो नागरिकांना मोठा मानसिक त्रास सोसावा लागला. निदर्शने आंदोलन आटोपल्यावर दुपारी बारा वाजेनंतर मोक्षघाटावर विधीस प्रारंभ करण्यात आला.
राज्यात सध्या गाजत असलेल्या बहुचर्चित ‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीसाठी श्रीक्षेत्र पैठण येथील ब्राह्मण समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या निदर्शनाचे नेतृत्व ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी, भूषण भंडारी, प्रकाश वानोळे, रेखाताई कुलकर्णी, दिलीपकाका पोहेकर, महेश जोशी, महिला अध्यक्षा सुजाता भंडारी, उपनगराध्यक्षा सुचित्रा जोशी, सुदेश कुलकर्णी यांनी केले.दशक्रीया चित्रपटात पैठणच्या ब्राह्मण समाजाचे चुकीचे व बदनामीकारक चित्रण करण्यात आल्याने या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शकांचा निषेध यावेळी करण्यात आला. या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजातर्फे देण्यात आला.
निदर्शने आंदोलनात नगरसेवक भूषण कावसनकर, रेणुकादास गर्गे, दिलीपकाका पोहेकर, उत्तमगुरू सेवणकर, चंद्रकांत महेश पाठक, दत्तागुरू पोहेकर, रविदेवा साळजोशी, अनंत खरे, संतोषदेवा जोशी, सतीश वाघेश्वरी, विजय शिवपुरी, अंबादास पेठे, किरणदेवा साळजोशी, चित्रा जोशी, कल्पना धर्माधिकारी, संगीता खरे, पाडळकर, संध्या पारवे, मंजुषा जोशी, कांचन कुलकर्णी, सुनीता जोशी, हेमा कुलकर्णी, शोभा जोशी, गायत्री निरखे, निर्मला जोशी, अश्विनी चक्रे, मंगला कावळे, कल्पना धर्माधिकारी, लता पेठे, शीतल महेश पाठक, तृप्ती महेश पाठक, अश्विनी धर्माधिकारी, ऋतूजा उज्जैनकर, अनिता भागवत, मयूर वैद्य, अमोल कुलकर्णी, हरिपंडीत गोसावी, प्रकाश कावळे, प्रसाद भागवत, कपिल कावसनकर, विशाल पोहेकर, रमेश पाठक यांच्यासह शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी समाजातर्फे शहरात मूकमोर्चाही काढण्यात आला.
दशक्रिया विधी नाही
शहरातील शिवाजी चौकात ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आंदोलनात मोक्षघाटावर दशक्रिया विधी करणारे ब्राह्मण सहभागी झाल्याने मोक्षघाटावरील विधी बंद पडले होते.
मयतांचे नातेवाईक हवालदिल
पैठण येथे गोदावरी दक्षिणवाहिनी असल्याने या क्षेत्रास दक्षिण काशी व मोक्षतीर्थाचा दर्जा आहे. यामुळे हिंदू धर्मीय नागरिक मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या अस्ती गोदावरीत टाकून दशक्रिया विधी पैठण येथील गोदावरी काठावर केला जातो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालू असून पैठणच्या गोदावरी काठावर दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सरासरी १०० दशक्रिया विधी पार पडतात. दशक्रिया विधी करण्यासाठी औरंगाबाद, जालना, बीड ,अहमदनगरसह मराठवाडाभरातून मृत व्यक्तीचे नातेवाईक पैठण येथे येत असतात. आजही सकाळपासून दशक्रिया विधीसाठी मृतांच्या परिवारातील सदस्य व नातेवाईक गोदावरीच्या मोक्षघाटावर हजर झाले होते. परंतु ब्राह्मण उपलब्ध नसल्याने विधी करता येत नव्हता. यामुळे सर्वच हतबल झाले होते. प्रतिक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने मोक्ष घाटावर ठिकठिकाणी बाहेरगावाहून आलेले शेकडो महिला, पुरूष बसून होते.
कल्पना असती तर आलो नसतो
दशक्रिया विधी सकाळी होणार नाही याची कल्पना असती तर आम्ही दुसरीकडे गेलो असतो. दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिला, पुरूष व बालकांचे यामुळे मोठे हाल झाले, अशा संतप्त प्रतिक्रिया जोडमालेगाव (ता. गेवराई जि. बीड) येथून मामाच्या दशक्रिया विधीसाठी आलेले नितीन घोरतळे यांनी दिली. याचप्रमाणे गेवराई बाशी येथील संभाजी सोरमारे, गाढेजळगाव येथील संजय मरकड आदींनीही तीव्र नाराजी करुन प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दुपारी १२ नंतर विधी सुरू
निदर्शने आंदोलन आटोपल्यावर तातडीने ब्रह्मवृंद मोक्षघाटावर पोहचले व त्यांनी विधीस प्रारंभ केला. विधीस तब्बल सहा तासाचा विलंब झाल्याने सायंकाळी चार -साडेचार वाजेपर्यंत गोदावरी काठावर विधी चालू होते.
चित्रपटास पाठिंबा
ब्राह्मण समाजाच्या वतीने चित्रपटास विरोध होत असताना आज दुपारी या चित्रपटास पाठिंबा असल्याचे निवेदन प्रकाशित करण्यात आले. या निवेदनावर ज्ञानेश्वर जाधव, हरिभाऊ शेळके, गणेश पवार, राजू बोंबले, संदीप तांबे, कल्याण भुकेले, भाऊसाहेब पिसे, धनंजय सुर्यवंशी, अशोक कर्डिले, किशोर सदावर्ते, आदींंच्या स्वाक्ष-या आहेत.