घाण पाण्यातच उरकावे लागतात दशक्रिया विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:06 AM2021-02-06T04:06:16+5:302021-02-06T04:06:16+5:30
संजय जाधव पैठण : मोक्षभूमी असलेल्या पैठण शहरातील गोदावरी पात्रात गटारगंगेचे पाणी साचले आहे. कित्येक दिवसांपासून वाहते नसल्याने हे ...
संजय जाधव
पैठण : मोक्षभूमी असलेल्या पैठण शहरातील गोदावरी पात्रात गटारगंगेचे पाणी साचले आहे. कित्येक दिवसांपासून वाहते नसल्याने हे पाणी अत्यंत घाण झाले असून, नागरिकांना दशक्रिया विधी याच घाण पाण्यात उरकावे लागत आहे. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, भाविकांसाठी जायकवाडी धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्याची मागणी समोर आली आहे.
‘मरण काशीत नाही, तर गावच्या वेशीत आले तर मोक्ष मिळतो’ अशी धारणा आहे. याच धारणेतून दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठण नगरीत गोदावरी पात्रात पिंडदान, दशक्रिया विधी व अस्थिविसर्जन करण्याची परंपरा पैठण शहरात पूर्वापार सुरू आहे. नाथ मंदिरा पाठीमागील मोक्षघाटावर दररोज शेकडो दशक्रिया विधी होतात. या विधीसाठी गोदावरीत स्नान करावे लागते. सध्या गोदावरीत पात्रात शहरातील नाल्यातून वाहून आलेले पाणी साचले असून, भाविकांना मात्र याच पाण्यात स्नान करून विधी उरकावा लागत आहे. ऐपतीप्रमाणे काही जण टँकर विकत घेऊन दशक्रिया विधी उरकत आहेत. गरिबांना या घाण पाण्याचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याने, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. श्रद्धेला मोल नसते, असे म्हटले जाते. मात्र, श्रद्धेच्या विश्वासावर गोदावरी पात्रात चक्क गटार गंगेचे पाणी डोक्यावर घेत गोदास्नानाचे पुण्य पदरात पाडून घेण्याची वेळ भाविकांवर येत असल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे.
कोट
गोदावरीतून पाणी सोडा
पैठण पात्रात पुढे बंधारा असल्याने, जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी वाया जात नाही. गेल्या ३ महिन्यांपासून धरणातून पाणी सोडण्यात न आल्याने गोदावरी पात्रात शहरातील नाल्याचे पाणी जमा झाले आहे. याच पाण्यात भाविकांना स्नान करावे लागत असून, धार्मिक भावनेला तडा जात आहे. त्यामुळे लवकर धरणातून पाणी सोडावे.
- गुरू अनंत खरे, मोक्षघाट
कोट
पात्रात घाण पाणी
गोदावरी पात्रात शहरातील सर्व नाल्यांचे घाण पाणी गेल्या चार महिन्यांपासून जमा होत आहे. या पाण्यात अळ्या पडलेल्या आहेत. पाण्यातून बाहेर आल्यानंतर अंगास खाज सुटते. येथे स्नान करणाऱ्या भाविकांची ही खरोखर चेष्टा आहे.
-अनिल लिंबोरे, मच्छीमार.
कोट..
पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करू
शहरात भाविकांना दुर्दैवाने घाण पाण्यात स्नान करावे लागत आहे. ही मोठी खेदाची बाब असून, गोदावरी पात्रात पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करू.
- दत्ता गोर्डे, राष्ट्रवादी तालुका संपर्कप्रमुख.
एकादशीसाठी पाणी सोडण्याचा जुना निर्णय
भाविकांसाठी दर एकादशीला जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने १९९७ला घेतलेला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. याबाबत जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करू.
- ज्ञानेश्वर कापसे, जि. प. सदस्य.
फोटो : गोदावरीच्या घाण पाण्यात दशक्रिया विधीनंतर स्नान करताना भाविक.