वाळूज महानगरात दत्त जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:05 AM2020-12-30T04:05:31+5:302020-12-30T04:05:31+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात मंगळवारी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भाविकांनी टाळ ...
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात मंगळवारी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात पावली खेळत पालखी मिरवणूक काढली होती.
बजाजनगरात श्री दत्त मंदिर दत्तधाम, श्री चक्रधर स्वामी ट्रस्टच्या वतीने सकाळी ८ वाजता मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन महाआरती करण्यात आली. मंदिरात महाआरती व पूजा झाल्यानंतर सकाळी ९ वाजता मूर्तीची पालखीमधून जल्लोषात मिरणवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत सहभागी पुरुष भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात पावली खेळत तर महिलांनी फुगड्या खेळत या मिरवणुकीत सहभाग नोंदविला. बजाजनगरातील रमेश मोरे चौक, जागृत हनुमान मंदिर, मोहटादेवी मंदिर चौक, त्रिमूर्ती चौक, लोकनेते गोपीनाथ मुंडे चौक, महाराणा प्रताप चौक मार्गे मंदिरात या पालखी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी प. पू. महंत लासूरकर बाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सभामंडपाचे उद्घाटन प. पू. महंत फलटणकर बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. महाप्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमाला अनिल चोरडीया, जयप्रकाश सारंग, मोहन नरके, ज्ञानेश्वर उगले, राजू उगले, गोविंद बाहेकर, ज्ञानेश्वर डाके, शिवाजी शिंदे, सुदाम उकिर्डे, शेषराव देवकर, मधुकर कपाटे आदींसह भाविकांची उपस्थिती होती. या परिसरातील रांजणगाव, वाळूज, नायगाव-कबवालनगर, सिडको वाळूज महानगर, वळदगाव आदी ठिकाणीही श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
फोटो ओळ- बजाजनगरात दत्त जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत सहभागी भाविक छायाचित्रात दिसत आहेत.