सुनेसह पुतण्याने केला ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 12:54 AM2017-02-03T00:54:21+5:302017-02-03T00:57:37+5:30
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली असून, सुनेनेच चुलत दिराच्या मदतीने वृद्ध सासू सासऱ्याचा घात केल्याचे तपासात पुढे आले आहे.
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली असून, सुनेनेच चुलत दिराच्या मदतीने वृद्ध सासू सासऱ्याचा घात केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी दोघांनाही गुरूवारी रात्री ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी वाळके यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मंठा तालुक्यातील तळणी येथे २९ जानेवारी रोजी नामदेव हनवते (७६) आणि जनाबाई नामदेव हनवते (६८) यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला होता शवविच्छेदन अहवालात दोघांही मारहाण झाल्याचे नमूद होते. तसेच त्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीत फेकल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच मुलगा ज्ञानदेव हनवते याने शेतीच्या वादातून आपल्या आई वडीलांचा खून झाल्याचे सांगून गावातील चार जणांवर संशय व्यक्त केला होता. त्यावरून मंठा पोलिसांनी संशयित म्हणून चौघांवर खून व अॅट्रासिटीचा गुन्हा बुधवारी दाखल केला होता.
दरम्यान, या घटनेचा तपास करताना सून अलका हनवते व मयतांचा पुतण्या पंढरी हनवते या दोघांनीच हे कृत्य केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी दोघांनाही गुरूवारी रात्री ताब्यात घेतले.
दरम्यान, या खूनामागचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. त्यांच्या चौकशीतूनच कारण पुढे येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)