पहिल्याच दिवशी दौलताबाद किल्ल्याला ..... पर्यटकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:22 AM2020-12-11T04:22:03+5:302020-12-11T04:22:03+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यभरातील धार्मिक व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. गेल्या नऊ महिन्यांपासून कुलूपबंद असलेल्या पर्यटनस्थळांना ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यभरातील धार्मिक व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. गेल्या नऊ महिन्यांपासून कुलूपबंद असलेल्या पर्यटनस्थळांना आता शासनाने काही नियम व अटींच्या अधीन राहून उघडण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ऐतिहासिक दौलताबाद किल्ला गुरुवारी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. खिडकीवर तिकीट न देता पर्यटकांना ऑनलाइन बुकिंगचा पर्याय देण्यात आलेला आहे. यामुळे पहिल्या दिवशी पर्यटकांची संख्या खूप कमी होती. किल्ल्यात प्रवेश सुरू झाल्यानंतर सकाळी ८ वाजता सुमेर सिंग सतवन, हरिसिंग बालोद, कुवर सुलाने (रा. जाफराबाद, जि. जालना) यांनी प्रथम प्रवेश केला. किल्ल्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या किल्ल्यावर चढताना पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
चौकट
दररोज दोन हजार पर्यटकांना प्रवेश
कोरोनामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दररोज सकाळच्या सत्रात १ हजार व दुपारच्या सत्रात १ हजार असे दोन हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन बुकिंग राहणार असून www.asi.payumoney.com या वेबसाइटवर बुकिंग करता येणार असल्याची माहिती किल्ला सहायक संवर्धक संजय रोहनकर यांनी दिली.