दौलताबाद वाहतूक कोंडी; पर्यायी रस्ता बनविण्याचे वेळापत्रक सादर करा; खंडपीठाचे निर्देश
By प्रभुदास पाटोळे | Published: July 13, 2023 06:38 PM2023-07-13T18:38:58+5:302023-07-13T18:39:58+5:30
औरंगाबाद खंडपीठाचे राष्ट्रीय महामार्ग विभागाला निर्देश
छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद किल्ल्यासमोरील ऐतिहासिक तटबंदी सुरक्षित ठेवून त्या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुचविलेल्या पर्यायाच्या संपूर्ण प्रकल्पाचे वेळापत्रक त्यांनी मंगळवारी (१८ जुलै) सादर करण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी बुधवारी ‘सुमोटो’ जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिले.
ऐतिहासिक तटबंदी सुरक्षित ठेवून या मार्गावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी किल्ल्याच्या पूर्वेकडून शासनाच्या १.५ कि. मी. जमिनीतून जाणारा अब्दीमंडी ते दौलताबाद घाटापर्यंत ३.५ कि. मी.चा पर्यायी रस्ता तयार करणे हा तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीने व्यवहार्य पर्याय असल्याचे शपथपत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने बुधवारी खंडपीठात सादर केले.
२३ एप्रिल २०२३ रोजी दौलताबाद किल्ल्यासमोरील ऐतिहासिक दरवाजात वाहतूक कोंडी झाली होती. येथे पर्यायी मार्गच नसल्यामुळे अनेक वाहने आणि विशेषत: पर्यटक सुमारे तीन तास खोळंबले होते. अमिकस क्युरी म्हणून खंडपीठाने ॲड. नेहा कांबळे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी याचिका तयार करून खंडपीठात सादर केली.
संबंधित रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक वर्षापूर्वी तीन पर्याय सुचविले होते. यापूर्वीच्या सुनावणीवेळी भारतीय पुरातत्व विभागातर्फे ॲड. भूषण कुलकर्णी यांनी खंडपीठापुढे ते सादर केले होते. त्यात सुचविल्यानुसार एक पर्याय किल्ल्याच्या पूर्वेकडून अब्दीमंडीतून घाटापर्यंत ३.५ कि. मी.चा पर्यायी रस्ता तयार करणे, जो शासनाच्या १.५ कि. मी. जमिनीतून जाईल. दुसरा पर्याय दौलताबादच्या वळणापासूनच थेट घाटापर्यंत पर्यायी रस्ता सुचविला आहे. मात्र, हा मार्ग वस्तीमधून जाणार असून, याला जादा खर्च लागेल. तिसरा पर्याय किल्ल्याच्या पाठीमागून घाटाला जोडणारा सुमारे ७ कि. मी.चा पर्यायी रस्ता सुचविला होता.
मात्र, बुधवारी सादर केलेल्या शपथपत्रात अब्दीमंडी ते दौलताबाद घाटापर्यंत रस्ता तयार करण्याचा पर्याय व्यवहार्य असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शासनातर्फे सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी काम पाहिले.