दौंड - नांदेड पॅसेंजर कधी धावणार ? एक्स्प्रेस, डेमू रेल्वेतून प्रवास करताना खिशाला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 06:35 PM2021-12-18T18:35:27+5:302021-12-18T18:39:58+5:30
पॅसेंजरअभावी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :कोरोना प्रादुर्भावात काही पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बदलल्या, तर काही डेमू रेल्वे म्हणून धावत आहे. नियमित एक्स्प्रेसही आता सुरु झाल्या आहेत. मात्र, अजूनही दौंड - नांदेड पॅसेंजरसह अन्य काही पॅसेंजर सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. परंतु पॅसेंजरअभावी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नगरसोल - काचिगुडा पॅसेंजर, दौंड - नांदेड पॅसेंजर, जालना - नगरसोल डेमू या रेल्वे कधी सुरु होतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले, काचिगुडा- रोटेगाव डेमू रेल्वे ही नगरसोलपर्यंत नेली पाहिजे. त्यातून प्रवाशांची सोय होईल.
पॅसेंजर झाली एक्स्प्रेस
औरंगाबाद-हैदराबादर ही पॅसेंजर आता एक्स्प्रेसमधून धावत आहे. त्याबरोबर निजामाबाद-पुणे, काचिगुडा-रोटेगाव, नांदेड - मनमाड डेमू रेल्वे धावत आहे. पॅसेंजरच्या तुलनेत डेमू रेल्वेसाठी अधिक भाडे असल्याची ओरड प्रवाशांतून होत आहे.
जनरल तिकिट बंदच
रेल्वेचा स्पेशल दर्जा काढून आता पूर्वीप्रमाणे नियमित रेल्वेगाड्या धावत आहेत. परंतु अजूनही जनरल तिकीट विक्री बंदच असल्याने मराठवाडा, तपोवन, नंद्रीग्राम, देवगिरीसह अन्य काही एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांतून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासच करता येत नाही. याविषयी प्रवाशांतून ओरड होत आहे.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस :
जनशताब्दी एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, अजिंठा एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस
पॅसेंजर सुरु करा
प्रवाशांच्या सुविधेसाठी पूर्वीप्रमाणे पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याची गरज आहे. डेमू आणि एक्स्प्रेस रेल्वेतून प्रवास करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. सर्वसमान्यांना हे परवडणारे नाही.
- सुर्यकांत गायके, प्रवासी
इतर ठिकाणी सुरु
मुंबईत लोकल रेल्वे धावत आहेत. इतर विभागांमध्येही पॅसेंजर धावत आहे. आपल्याकडे मात्र, पॅसेंजर सुरु केल्या जात नसल्याचे समजते. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
- अभिजित कुलकर्णी, प्रवासी