आंदोलनाचा दिवस

By Admin | Published: July 15, 2014 12:17 AM2014-07-15T00:17:57+5:302014-07-15T00:58:37+5:30

हिंगोली : विविध मागण्यांसाठी विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी सोमवारी आंदोलन केल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले. त्यामुळे कामानिमित्त या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.

Day of agitation | आंदोलनाचा दिवस

आंदोलनाचा दिवस

googlenewsNext

हिंगोली : विविध मागण्यांसाठी विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी सोमवारी आंदोलन केल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले. त्यामुळे कामानिमित्त या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.
जिल्ह्यात सध्या विविध शासकीय कर्मचाऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आंदोलन झाले. त्यानंतर २ जुलैपासून जिल्ह्यातील ग्रामसेवक बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत राज्यस्तरावरून तोडगा निघत नसल्याने १३ व्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. या पार्श्वभूमीवर सोमवारीही विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी दिवसभर लेखणीबंद आंदोलन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये काहीही काम झाले नाही. परिणामी विविध कामानिमित्त या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने सकाळी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी गरूड, ऋ षी, सूर्यकांत तत्तापुरे, माधव कारगुडे, इम्रान पठाण, गोपाळ कंठे आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने दुपारी २ वाजता जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जी. बी. कदम, कार्याध्यक्ष श्रीमती हाटकर, आर. एस. रोडे, पी. पी. कुलकर्णी आदींनी सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र राज्य एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पाणलोट व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यात ९० कर्मचारी कार्यरत आहेत. मागील तीन ते चार वर्षांपासून हे कर्मचारी ग्रामीण भागात काम करतात. त्यातील कृषी तज्ज्ञ, उपजिवीका तज्ज्ञ, समूह संघटक या कर्मचाऱ्यांची पूर्वसेवा लक्षात घेता त्यांना सेवेत कायम करणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून या कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबई येथे आंदोलन केले होते. तिथे तोडगा निघाला नसल्यामुळे १४ जुलै रोजी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्याआधी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष व्ही. जी. खिल्लारे, उपाध्यक्ष व्ही. एल. वनजे, सचिव एस. डी. साळुंके, सहसचिव एम. यु. शिंदे, बी. एम. भिसे, सहसंघटक जी. एल. लोखंडे, महिला संघटक व्ही. एन. बलखंडे, व्ही. एन. जाधव, आर. के. जाधव, पी. एस. बगाटे, करूणा ढेपे, किरण भालेराव, अर्चना शिंदे, उखा मुरकुटे यांच्यासह ९० कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. ( प्रतिनिधी)
एका दिवसात तीन कर्मचारी संघटनांचे आंदोलन
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आल्याने तहसील, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
महाराष्ट्र राज्य एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेनेही केले हिंगोलीत आंदोलन.
जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे गेल्या तेरा दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरूच असल्याने ग्रामस्थांनी अडचण.
कर्मचारी संघटनांच्या आंदोलनांमुळे विविध कामानिमित्त या कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांची गैरसोय.
आंदोलन काळातील वेतन कपात करण्याची मागणी.
पालिका कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप
वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पाणलोट विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आता नगर पालिकेचे कर्मचारी १५ जुलैपासून बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही नगर पालिकांचे कामकाज मंगळवारपासून ठप्प होणार आहे. परिणामी जनतेची गैरसोय वाढणार आहे.

Web Title: Day of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.