एक दिवस अगोदरच पेपर झाल्याने विद्यार्थी परीक्षेपासून मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:22 PM2019-04-27T23:22:09+5:302019-04-27T23:22:36+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रंथालयशास्त्र विभागात विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर एक तारीख, तर वेळापत्रकात दुसरीच तारीख दर्शविल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले़
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रंथालयशास्त्र विभागात विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर एक तारीख, तर वेळापत्रकात दुसरीच तारीख दर्शविल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले़
विद्यापीठातील ग्रंथालयशास्त्र विभागाच्या ‘इन्फॉर्मेशन सोर्सेस अॅण्ड सर्व्हिसेस-३’ विषयाचा पेपर विद्यापीठाच्या वेळापत्रकात २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याचे वेबसाईटवर दर्शविण्यात आले होते; परंतु दहा ते बारा दिवसांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या हॉलतिकिटावर याच पेपरची तारीख २७ एप्रिल देण्यात आली़ २७ एप्रिलला पेपर असल्याचे समजून विद्यार्थ्यांनी तयारी केली; परंतु विद्यापीठाने ही परीक्षा २६ एप्रिलला उरकून घेतली़ हॉलतिकिटावरील तारखेप्रमाणे विद्यार्थी परीक्षेला गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला़ एक दिवस अगोदरच परीक्षा झाल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले़ विद्यापीठाच्या या गलथान कारभारामुळे अनेक विद्यार्थी या पेपरच्या परीक्षेपासून वंचित राहिले़ दरम्यान, याप्रकरणी संबंधितांवर कडक कार्यवाही करून सदरच्या पेपरची नव्याने परीक्षा घेण्याची मागणी मराठवाडा लॉ कृती समितीने केली आहे़