मतदानाच्या दिवशीही कुलगुरू गेले दौ-यावरच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:41 AM2017-11-25T00:41:09+5:302017-11-25T00:41:12+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा मतदानाच्या दिवशीही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे दौºयावरच होते. ऐन मतदानाच्या कार्यकाळातच तीन दिवसांपासून दौ-यावर असलेल्या कुलगुरूंनी दिल्लीहून मुंबईतील एका बैठकीला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिल्याबद्दल विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा मतदानाच्या दिवशीही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे दौºयावरच होते. ऐन मतदानाच्या कार्यकाळातच तीन दिवसांपासून दौ-यावर असलेल्या कुलगुरूंनी दिल्लीहून मुंबईतील एका बैठकीला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिल्याबद्दल विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील २० केंद्रांवर शुक्रवारी मतदान झाले. या मतदानासाठी प्रत्येक बाबीवर काळजीपूर्वक नियोजन करावे लागते. मतदानाच्या आदल्या दिवशी ऐनवेळी मतपत्रिका कमी पडल्या. याचा परिणाम उस्मानाबाद, उमरगा, अंबाजोगाई आदी दूरच्या मतदान केंद्रांवर कर्मचाºयांना पोहोचण्यास मध्यरात्रीपेक्षा अधिक कालावधी लागला. याचवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणुकीसंदर्भातील याचिकांचा निकाल मतदानाच्या दिवशीच जाहीर करण्यासाठी सुनावणी ठेवली होती. यात कोणताही निर्णय येऊ शकत होता. बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी दिवसभर खंडपीठात सुनावणीसाठी हजर होते. यामुळे गुरुवारी मतदान यंत्रणेला सर्व प्रकारच्या सूचना, प्रशिक्षण देण्यात उशीर झाला. यातच बुधवारी सायंकाळी निवडणुका पुढे ढकलल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. यामुळे अवघ्या १२ दिवसांपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारीपदाचा पदभार स्वीकारलेल्या डॉ. साधना पांडे यासुद्धा निराश झाल्या होत्या. अशा सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यापीठात थांबणे आवश्यक होते.
या निवडणुकीचा परिणाम विद्यापीठाच्या आगामी पाच वर्षांवर होणार आहे. असे असताना बुधवारपासून दिल्ली दौºयावर असलेले कुलगुरू गुरुवारी सायंकाळी विद्यापीठात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र कुलगुरूंनी विद्यापीठात येण्याऐवजी मुंबईला जाणे पसंत केल्याचे समजते. मुंबईत सर्व विद्यापीठांचा विकास प्रस्ताव सादर करण्यासाठी ‘रुसा’ची बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीला राज्यातील एकाही विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित नव्हते; मात्र औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू त्याठिकाणी उपस्थित राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. तुमच्याकडे मतदान असताना तुम्ही बैठकीला कसे? असा प्रश्नही एका अधिकाºयाने कुलगुरूंना विचारल्याचे समजते. याविषयी कुलगुरूंशी वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.