‘डीसीसी’च्या एमडींना ठेवीदारांचा घेराओ !
By Admin | Published: May 2, 2017 11:37 PM2017-05-02T23:37:28+5:302017-05-02T23:38:28+5:30
उस्मानाबाद : ‘पैसे नाहीत, नंतर या’ या उत्तराला कंटाळलेल्या अनेक ठेवीदारांनी मंगळवारी दुपारी डीसीसीच्या कार्यकारी संचालकांना घेराओ घातला़
उस्मानाबाद : कुणाच्या मुला-मुलीचे लग्ऩ़़ कुणाच्या आई-वडिलांचा दवाखाना तर कुणाच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च अशा एक ना अनेक कामासाठी पैसे मिळवेत म्हणून ठेवीदार डीसीसीच्या मुख्य शाखेत दररोज चकरा मारत आहेत़ ‘पैसे नाहीत, नंतर या’ या उत्तराला कंटाळलेल्या अनेक ठेवीदारांनी मंगळवारी दुपारी डीसीसीच्या कार्यकारी संचालकांना घेराओ घातला़ पैसे द्या, अन्यथा बँकेला कुलूप ठोकू, अशी भूमिका उपस्थित काही महिलांनी घेतली होती़
रोखे घोटाळे, विना तारण कर्जवाटप, कर्ज वसुलीची न्यायप्रविष्ठ प्रकरणे अशा अनेक कारणांनी जिल्हा बँकेची आर्थिक घडी कोलमडली आहे़ दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्ज वसुली आणि पीकविम्यातील रक्कम कर्जात कपात करू नयेत, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत़ दुसरीकडे कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली आहेत़ असे असले तरी जिल्ह्यातील जवळपास ६ लाख ठेवीदारांचे आजही जिल्हा बँकेकडे ४४० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत़ यात शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचा समावेश असून, अनेकांनी भविष्यातील प्रश्नांना सोडविण्यासाठी पै-पै करून जिल्हा बँकेत ठेवी ठेवल्या आहेत़ कोणाच्या ५० हजार तर कोणाच्या १० लाखापर्यंत ठेवी आहेत़ यापेक्षा अधिक ठेवी असलेल्या बड्या ठेवीदारांची संख्याही मोठी आहे़
गत रबी हंगामातील पीक विम्याची रक्कम सध्या जिल्हा बँकेत आली आहे़ ही रक्कम आल्यानंतर प्रारंभी शासनाने कर्ज खात्यात काही रक्कम कपात करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार डीसीसीने जवळपास पाच कोटी रूपयांची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करून घेतली होती़ सर्वस्तरातून होणारा विरोध पाहता शासनाने पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करून घेऊन नये, अशा सूचना दिल्या़ त्यानंतर कपात केलेली रक्कम खातेदारांच्या खात्यावर वर्ग करावी, यासाठी आंदोलने करण्यात आली़ त्यानंतर बँकेने कपात केलेल्या रक्कमेबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविल्याचे सांगितले़
जिल्ह्यातील अनेक ठेवीदार शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जिल्हा बँकेत पैसे मिळविण्यासाठी चकरा मारत आहेत़ मंगळवारी सकाळीच महिलांसह वयोवृध्द ठेवीदारांनी चक्कम कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील यांच्या कक्षात प्रवेश करून घेराओ घातला़ मुला-मुलींचे लग्न, शैक्षणिक काम, दवाखान्याचा खर्च अशा एक ना अनेक प्रश्न सांगून येणारा प्रत्येक ठेवीदार पैशाची मागणी करीत होता़ अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या उत्तरांनी समाधान होत नसल्याने उपस्थित काही महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट बँकेलाच टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला होता़ भूम तालुक्यातील गोलेगाव येथील लंका डोके, जळकोट तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील सलीमा शेख, अकुबाई (पा़) येथील शांता कसबे, अंबेजवळगा येथील अब्दुल शेख यांच्यासह इतर ठेवीदारांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते़ यावेळी झालेल्या चर्चेनंतर घोणसे-पाटील यांनी लवकरच पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठेवीदार तेथून निघून गेले़(प्रतिनिधी)