अनाथ मुलीच्या नावे ‘डीसीसी’ची नोटीस
By Admin | Published: January 2, 2017 11:50 PM2017-01-02T23:50:23+5:302017-01-02T23:53:07+5:30
वाशी : मृत्यूपूर्वी वडिलांनी काढलेल्या कर्जाचा भरणा करण्यासंदर्भात जिल्हा बँकेने अनाथ मुलीस नोटीस बजावली
वाशी : मृत्यूपूर्वी वडिलांनी काढलेल्या कर्जाचा भरणा करण्यासंदर्भात जिल्हा बँकेने अनाथ मुलीस नोटीस बजावली असून, थकित कर्ज न भरल्यास घरासमोर बँड वाजविण्याचा इशाराही नोटिसीत देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, याबाबत सदर मुलीने पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व प्रशासनाला निवेदने देवून कर्ज वसुली करू नये, अशी मागणी केली आहे.
तालुक्यातील पारा येथील निशिगंधा विलास पानसे ही सहा वर्षाची असताना तिच्या आई-वडिलाचे पैठण येथे अपघाती निधन झाले. मृत्यूपूर्वी तिच्या वडिलांनी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ७४ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम आज १ लाख ८६ हजार इतकी झाली आहे. सध्या निशिगंधा ही १२ वीच्या वर्गात शिकत असून तिचे पालन पोषन हे तिचे काका करत आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेने निशिगंधा हिलाही वसुलीसंदर्भात नोटीस बजावली आहे. यामुळे सदर मुलीचे मानसिक संतुलन ढासळले आहे. निशिगंधा हिच्या नावे डोंगरेवाडी शिवारात एक हेक्टर जमीन असून, यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सध्या तिचा उदरनिर्वाह चालू आहे. त्यामुळे थकीत कर्जापोटी शासनाकडून मिळणारे अनुदान, पीकविमा यातून कुठलीही कपात करू नये, अशी विनंती देखील तिने निवेदनात केली आहे.
सदरील रक्कम परस्पर कापून घेतल्यास माझ्या उदरनिर्वाहासाठी व शिक्षणासाठी काहीच उरणार नाही, असेही तिने निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, सहकार मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हानिबधंक आदींना पाठविण्यात आल्या आहेत.