लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत
By स. सो. खंडाळकर | Published: September 11, 2024 07:56 PM2024-09-11T19:56:41+5:302024-09-11T19:57:20+5:30
आधार लिंक नव्हे तर शेवटचे फिडिंग झालेल्या खात्यावर पैसे जमा
छत्रपती संभाजीनगर : आधार लिंक नव्हे तर शेवटचे फिडिंग झालेल्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याने काही लाडक्या बहिणी आश्चर्यचकित झाल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जात आधार लिंक करून दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. पण, शेवटचे आधार फिडिंग ज्या बँकेच्या अकाउंटशी झाले, तेथे पैसे जमा झाले. हे बरेच दिवस या लाडक्या बहिणींना कळलेच नाही. त्यामुळे आपले पैसे आले कसे नाही, या विवंचनेत त्या राहिल्या.
तेजश्री दांडो (रा. रामनगर, मुकुंदवाडी) यांनी अर्जात कॅनरा बॅँक लिहिलेले असतानाही त्यांना बँक ऑफ बडोद्यातून पैसे मिळाले. ताराबाई जैस्वाल (जुना मोंढा, भवानीनगर) यांनी अर्जात कॅनरा बँक नमूद केले होते. पण, त्यांना पैसे मिळाले स्टेट बॅँक ऑफ इंडियातून. पूजा अनिल आवडे (रा. कबीरनगर) यांनी अर्जात बँक ऑफ बडोदा नमूद केले. पैसे मिळाले स्टेट बँक ऑफ इंडियातून. आरती दीपक सोनकामळे (रा. चौसरनगर) यांनी अर्जात बँक ऑफ महाराष्ट्र लिहिलेले होते. पण, त्यांना भारत फायनान्शियल कंपनी, टाय विथ इंडसइंड बँकेतून पैसे मिळाले. अश्विनी दत्ता फुके (रा. एन-९, टीव्ही सेंटर) यांना नमूद केल्याप्रमाणे कोटक बँकेतून पैसे न मिळता पोस्ट खात्यातून पैसे मिळाले. आधार लिंकपेक्षाही शेवटची फिडिंग कुठल्या अकाउंट नंबरला झालेली आहे, तिथे पैसे जमा झाले. पण, लाडक्या बहिणी अर्जात नमूद बँकांमध्ये जाऊन चौकशी करू लागल्या.
महिलांनी घाबरू नये
हा गैरव्यवहार वगैरे काही नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून जाऊ नये. त्यांनी हव्या असलेल्या करंट अकाउंटशी आधार फिडिंग करून घ्यावे, तेथे त्यांना पैसे मिळत जातील. लिंक आणि फिडिंग हा वेगवेगळा विषय आहे, असा खुलासा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील अधीक्षक युवराज यांनी ‘लोकमत’कडे केला.
३ लाख ६९ हजार अर्ज मंजूर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १० सप्टेंबरपर्यंत ३ लाख ९० हजार ७२७ अर्ज आले. त्यापैकी ३ लाख ६९ हजार १६५ अर्ज मंजूर झाले. २९० प्रकरणे प्रोव्हिजनल अप्रूव्हलसाठी प्रलंबित आहेत. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे ७ हजार ६०५ प्रकरणे प्रलंबित आहेत. तर, २ हजार ७५४ प्रकरणे नामंजूर केलेली आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयातून मिळाली.