वर्षभरात १,५२९ बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:28 AM2017-12-13T00:28:24+5:302017-12-13T00:30:25+5:30
शहरात दरवर्षी ५० हजार बालकांचा जन्म होतो. यातील १५२९ बालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात दरवर्षी ५० हजार बालकांचा जन्म होतो. यातील १५२९ बालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना २०१६ मधील जन्म आणि मृत्यूदराची आकडेवारी मनाला चटका लावून जाणारी आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येथे रुग्ण येतात. घाटीच्या प्रसूतीशास्त्र विभागात दररोज ५० ते ७० बाळांचा जन्म होतो. याशिवाय महापालिकेतील पाच रुग्णालये, खाजगी रुग्णालयांमध्ये गरोदर महिलांची प्रसूती होते. शहरात कोणत्याही दवाखान्यात जन्म घेतलेल्या बाळाचे बर्थ सर्टिफिकेट महापालिकेतच घ्यावे लागते. प्रत्येक बालकाच्या जन्म-मृत्यूची नोंद महापालिकेला डोळ्यात तेल घालून करावी लागते. २०१६ मध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ४९ हजार २४० बालकांनी जन्म घेतला. यामध्ये २५ हजार ७२१ मुले, तर २३ हजार ५१९ मुलींची संख्या होती. मुलींचा जन्मदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत समाधानकारक आहे. जन्मापासून १ वर्षापर्यंत मरण पावलेल्या बालकांची संख्या १ हजार २९ आहे. यात मुलांची संख्या ६४६, तर मुलींची ३८३ आहे. जन्मापासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूची संख्या १७६ आहे. जन्मत:च मरण पावलेल्या बालकांची संख्या २८९ आहे. जन्मापूर्वीच मरण पावलेल्या बालकांची संख्या फक्त ३५ असल्याचा अहवालही मनपाच्या आरोग्य विभागाने शासनाला पाठविला आहे.
विविध कल्याणकारी योजना
केंद्र व राज्य शासनामार्फत माता मृत्यू, बालक मृत्यू दर कमी व्हावा यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. जन्मत:च मरण पावलेल्या मुलांचा आरोग्य विभागातर्फे स्वतंत्रपणे शोध घेण्यात येतो. यासाठी शासनाने समिती नेमलेली आहे. समिती मृत्यूच्या विविध कारणांचा शोध घेऊन शासनाला अहवाल सादर करते. महापालिका आरोग्य विभाग १०० टक्के शासन योजना राबवीत आहे. यासाठी आशा वर्कर्स आणि मनपाचे संपूर्ण कर्मचारी बाह्यरुग्ण विभागाचे काम संपल्यावर शासन योजनांवर काम करतात.
-संध्या टाकळीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
२०१६ चा जन्म-मृत्यू दराचा अहवाल
४९,२४०
बालकांचा जन्म
१,५२९
बालकांचा मृत्यू
९,५२९
मोठ्या व्यक्तींचा मृत्यू