आत्याच्या घरी मृत्यू, परस्पर दफनविधी; ६ दिवसांनी कब्रस्तानमधून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला

By सुमित डोळे | Published: November 24, 2023 03:26 PM2023-11-24T15:26:00+5:302023-11-24T15:26:39+5:30

शरीरावर खोल, गंभीर जखमांमुळे गूढ वाढले, कुटुंबालाही हत्येचा दाट संशय

Death at aunts home, mutual burial; After six days, the young man's body was removed from the cemetery | आत्याच्या घरी मृत्यू, परस्पर दफनविधी; ६ दिवसांनी कब्रस्तानमधून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला

आत्याच्या घरी मृत्यू, परस्पर दफनविधी; ६ दिवसांनी कब्रस्तानमधून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला

छत्रपती संभाजीनगर : नारेगावच्या १९ वर्षीय सालेह फरहान हिलाबी ऊर्फ शहजाद याचा घनसावंगीच्या आत्याच्या घरी १७ नोव्हेंबर रोजी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांना कुठलीही माहिती न देताच नातेवाइकांनी त्याचा मृतदेह शहरात आणून जिन्सीतील कब्रस्तानात पहाटेच परस्पर दफन केला. मात्र, कुटुंबाने पुन्हा त्याच्या हत्येचा संशय व्यक्त केला आणि अखेर सातव्या दिवशी गुरुवारी सालेहचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा वर काढण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, सालेहच्या शरीरावर गंभीर व खोल जखमा आढळल्याने ही हत्याच असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आई, वडील, दोन भावांसह सालेह नारेगावात राहतो. खासगी काम करून त्याचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. १४ नोव्हेंबर रोजी सालेह घनसावंगीच्या देवनगरीत राहणाऱ्या आत्याकडे गेला होता. येथून जालना व घनसावंगीला पोहोचेपर्यंत तो सातत्याने वडिलांच्या संपर्कात होता. १७ नोव्हेंबर रोजी मात्र रात्री ८:३० वाजता अचानक त्याच्या वडिलांना नातेवाइकांनी कॉल करून सालेहने आत्महत्या केल्याचे कळवले. घटनेने घाबरलेल्या वडिलांना त्यांनी पुन्हा कॉल करून मृतदेह शहरातच घेऊन येत असल्याचे सांगून रात्री १२ वाजताच ते मृतदेह घेऊन नारेगावमध्ये दाखल झाले होते.

पहाटे दफनविधी, मात्र कोणालाच माहिती नाही
काही तास घरी सालेहचा मृतदेह ठेवून नातेवाइकांनी जिन्सीच्या गंजे शहिदा कब्रस्तानात पहाटे ३:३० वाजता परस्पर दफनविधी केला. वडिलांना मात्र मुलाच्या मृत्यूविषयीची रुखरूख सल देत होती. त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. पहिले घनसावंगी पोलिसांकडे मुलाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर जिन्सी पोलिसांकडे अर्ज केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी यात तपासाची चक्रे फिरवली.

सहा दिवसांनी पुन्हा मृतदेह बाहेर काढला
गुरुवारी सकाळीच १० वाजता महसूलचे वरिष्ठ अधिकारी, घाटीचे डॉक्टर, फॉरेन्सिकचे पथक, जिन्सीचे निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक रावसाहेब काकड यांच्यासह घनसावंगी पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. कायदेशीर पंचनामा करून व्हिडीओग्राफरच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. दुर्गंध पसरू नये, यासाठी घाटीच्या पथकाने रसायनाचा वापर केला. त्यानंतर २.३० वाजता मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हत्याच, त्या खोल जखमा कशाच्या ?
सूत्रांच्या माहितीनुसार, आत्याच्या कुटुंबाने जरी आत्महत्या सांगितले असले, तरी तपासात सालेहच्या कपाळासह अन्य शरीरावर खोल जखमा आढळल्या आहेत. त्या कशाच्या आहेत, हे अद्याप अस्पष्ट असले तरी नातेवाईकांच्या दाव्यानुसार सालेहचा मृत्यू झालेल्या ठिकाणी रक्त देखील आढळले हाेते. त्यामुळे सालेहच्या हत्याच्याच दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. घनसावंगी पोलिसांशी वारंवार संपर्क करूनही मात्र घटनेतले तथ्य कळू शकले नाही.

हे प्रश्न अनुत्तरितच
-सालेहची आत्महत्या झाल्याचे वडिलांना कळवण्यात आले. मात्र, स्थानिक पाेलिसांना न कळवताच परस्पर मृतदेह शहरात का आणला ?
-नारेगावला कुटुंबाच्या घरी काही वेळच मृतदेह ठेवून पहाटेच दफनविधी का केला ?
-सालेहच्या अंगावर जखमा होत्या तरी कुटुंबातील कोणत्याच सदस्याने आक्षेप का घेतला नाही? शहरातही स्थानिक पोलिसांना घटनेविषयी का कळवले नाही ?
-सालेहचा मृतदेह नारेगावला आणल्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे जाळण्याचा किंवा फेकून देण्याचा सल्ला काहींनी का दिला ?

Web Title: Death at aunts home, mutual burial; After six days, the young man's body was removed from the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.