धारेश्वर धबधब्याखाली आंघोळीस गेलेल्या तरुणाचा कुंडात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 03:01 PM2019-08-13T15:01:50+5:302019-08-13T15:05:49+5:30
सोबतच्या मित्रांना अंदाजही आला नाही
सोयगाव ( औरंगाबाद ) : धारेश्वर धबधब्यावर आंघोळीसाठी गेलेल्या एका पर्यटकाचा पाय घसरल्याने कुंडातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.अविनाश राजू पवार (१८ ) असे मृताचे नाव असून पळाशी येथील महादेव मंदिर परिसरात ही घटना घडली.
या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, श्रावणी सोमवार निमित्त (दि. १२ ) कन्नड तालुक्यातील वाकी येथील पाच तरुण पर्यटक पळाशी शिवारातील धारेश्वर धारकुंड येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर पाचही तरुण धबधब्याच्या प्रवाहात अंघोळीसाठी गेले. यावेळी अविनाश पवार यास पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो तोल जाऊन कुंडात बुडाला. मात्र ही बाब गर्दी असल्याने इतर तरुणांच्या लक्षात आली नाही. अविनाश दिसत नसल्याने तरुणांना तो पुढे गेल्याचा समज झाला. यामुळे ते सर्व वाकीला परतले. गावातही तो पोहंचला नसल्याने सोमवारी रात्री त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला.मात्र तो आढळून आला नाही.
दरम्यान, मंगळवारी सकाळी एक मृतदेह कुंडातील पाण्यावर तरंगत असल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कुंडात शोधकार्य करून अविनाशचा मृतदेह बाहेर काढला. येथील एका ग्रामस्थाचे नातेवाईक वाकी येथे आहेत त्यांनी याबाबत तिकडे माहिती दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे, जमादार सुभाष पवार, प्रदीप पवार, कौतुक सपकाळ, दीपक पाटील आदी करत आहेत.