घराला लागलेल्या आगीत बालकाचा मृत्यू ,अन्य सात जणही होरपळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:59 PM2019-01-19T22:59:07+5:302019-01-19T22:59:53+5:30
: येथून जवळच असलेल्या शेवगा (ता. औरंगाबाद) येथील एका घराला शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंब होरपळले. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या सोळा महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी सकाळी मृत्यू झाला. भाजलेल्या अन्य ७ जणांवर उपचार सुरू आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
करमाड : येथून जवळच असलेल्या शेवगा (ता. औरंगाबाद) येथील एका घराला शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंब होरपळले. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या सोळा महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी सकाळी मृत्यू झाला. भाजलेल्या अन्य ७ जणांवर उपचार सुरू आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
नूर मोहम्मद जावेद बेग असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. महेक जावेद बेग (वय ८), यास्मीन राजू बेग (२८), अनिस राजू बेग (१२), अरमान राजू बेग (१०), सुहाना इलियास बेग (९), सुरय्या इलियास बेग (३२) अशी जळालेल्यांची नावे आहेत. जावेद वाहेद बेग हे शेतकरी असून, ते शेवग्यात पानटपरीचा व्यवसाय करतात. पत्र्याच्या तीन खोल्यांच्या घरात पत्नी, मुलगा आणि मुलींसह राहतात. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्राच्या घरातील बैठक खोलीत अचानक शॉर्टसर्किटमुळे स्पार्किंग झाल्याने तेथील प्लास्टिक चटईसह कपड्याने पेट घेतला. तेव्हा जावेद हे दुकानात होते. आग लागल्याने गावातील लोकांनी वीज वितरण कंपनीला फोन करून वीजपुरवठा बंद केला. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यावेळी जावेद यांच्या कुटुंबियासह भावाची पत्नी आणि लहान मुलेही घरात होते. आग लागताच समोरच्या खोलीतील काही जण घाईगडबडीत बाहेर पळाले; परंतु पळताना ते होरपळले. मधल्या खोलीतील जकिराबी जावेद बेग (वय ३०) यांना चिमुकल्या नूरसह आगीतून बाहेर पडता येईना. त्या कशाबशा बाहेर पळाल्या; परंतु त्यांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने माय-लेक गंभीररीत्या भाजले. लोकांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. होरपळलेल्या सर्वांना तातडीने घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले.
चौकट
चिमुकल्या नूरची मृत्यूशी बारा तास झुंज
आगीत गंभीररीत्या जळालेल्या चिमुकल्या नूरने घाटीत बारा तास मृत्यूशी झुंज दिली. शनिवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास मृत्यूने त्याला गाठले. नूर त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मातेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांकडून समजले.
----
संसारोपयोगी साहित्य जळून खाक
या आगीमुळे जावेद बेग यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि १५ हजार रुपये जळून खाक झाले. करमाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर, उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, जमादार रमेश धस करीत आहेत.