रेल्वेची परीक्षा देण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:22 PM2019-01-22T12:22:52+5:302019-01-22T12:27:22+5:30
आज रेल्वे विभागातील जागांसाठी त्यांची परीक्षा होती.
फुलंब्री (औरंगाबाद ) : तालुक्यातील पाथ्री येथील सीआरपीएफ मध्ये कार्यरत एका जवानाचा सोमवारी मिटमिटा येथे अपघात झाला होता. सोमवारी रात्री १२ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रशेखर त्रिंबकेश्वर बनसोड [ पाथ्रीकर, २२] असे मृत झालेल्या जवानाचे नाव आहे.
चंद्रशेखर हे २० डिसेंबर २०१७ साली सीआरपीएफ मध्ये भर्ती झाले. गेल्या वर्षभरापासून तो नागपूर येथे कार्यरत होता पण आठ दिवसा पूर्वी त्याची बदली गडचिरोली येथे झाली. दरम्यान, मंगळवारी (दि.२२ ) रेल्वे विभागातील जागांसाठी त्यांची परीक्षा होती. यासाठी ते पाच दिवसाची रजा घेऊन गावाकडे आले होते. सोमवारी ते दुचाकीवर औरंगाबाद मार्गे मिटमिटा येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. परत येताना त्यांचा ट्रक्टरसोबत अपघात झाला. यात गंभीरपणे जखमी चंद्रशेखर यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री १२ वाजे दरम्यान उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई -वडील तसेच दोन लहान भाऊ आहेत. या घटनेमुळे पाथ्री गावावर शोककळा पसरली असून आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल जाणार आहेत.