मरण देता का मरण...राज्यपालांकडे इच्छा मागणी
By Admin | Published: May 16, 2014 12:23 AM2014-05-16T00:23:30+5:302014-05-16T00:40:44+5:30
लालखाँ पठाण , गंगापूर सेवानिवृत्तीनंतर अर्धांगवायू आणि कर्करोग झालेल्या एका कर्मचार्यास जि. प. प्रशासनाकडून दोन वर्षानंतरही निवृत्तीवेतन मंजूर झालेले नाही.
लालखाँ पठाण , गंगापूर सेवानिवृत्तीनंतर अर्धांगवायू आणि कर्करोग झालेल्या एका कर्मचार्यास जि. प. प्रशासनाकडून दोन वर्षानंतरही निवृत्तीवेतन मंजूर झालेले नाही. जि. प. प्रशासनाच्या या अमानवी धोरणाला कंटाळून येथील वामन विश्वनाथ जाधव या सेवानिवृत्त कर्मचार्याने राज्यपालांकडे इच्छामरणास परवानगी द्यावी असा अर्ज सादर केला आहे. गंगापूर येथील वामन जाधव यांची ही करुण कहाणी असून एक वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायू व तद्नंतर लगेच कर्करोगाने ग्रासलेले आहे. १९७८ मध्ये ते प्रथम लघुपाटबंधारे विभाग, गंगापूर येथे हजेरी सहायक म्हणून रुजू झाले होते. यानंतर त्यांनी पैठण, औरंगाबाद, फर्दापूर, पंचायत समिती गंगापूर, खुलताबाद आदी ठिकाणी विविध पदांवर कर्तव्य बजावले. शेवटी ३० नोव्हेंबर २०११ रोजी कन्नड तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्य करत असताना ते सेवानिवृत्त झाले. दरम्यान, याच काळात खुलताबाद येथून वडनेर येथे हजर होण्यासाठी जात असताना त्यांच्या जवळील सेवापुस्तिका प्रवासामध्ये गहाळ झाली. त्यांनी सेवापुस्तिका शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यांना सेवापुस्तिका मिळाली नाही. या बाबत त्यांनी वरिष्ठांना कल्पनादेखील दिली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांची पेन्शन योजना मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला; मात्र संबंधित विभागाने नियमाने आपले काम करू असे सांगून त्यांची बोळवण केली. कार्यालयाच्या चकरा मारता-मारता त्यांचा जीव मेटाकुटीस आला. शिवाय दैनंदिन खर्च भागविण्यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असतानाच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. अर्धांगवायूचे उपचार सुरू असतानाच कर्करोग झाला असल्याचा उलगडा झाला. असाध्य रोगाची लागण झाल्याने त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. निदान होण्यासाठी महागडे रुग्णालय व महागड्या औषधीसाठी त्यांनी आपली सर्व जमापुंजी लावली, आता उसनवार करून उपचार सुरू आहेत. सेवापुस्तिका हरवल्याने नवीन सेवापुस्तिका मिळावी यासाठी त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करून मागणी केली होती; परंतु वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर यांनी अद्याप त्यांचा अहवाल कार्यालयात सादर सेवा केला नसल्याने त्यांना नवीन सेवापुस्तिकाही मिळू शकली नाही. याबाबत वामन जाधव यांच्या पत्नी आशाबाई जाधव यांनीदेखील जिल्हा परिषद प्रशासनाला चरितार्थ चालविण्यास कुठल्याच प्रकारचे साधन नसून पती दुर्धर आजाराने ग्रासल्याने कुटुंबाला पोसणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निवृत्तीवेतन मिळाले तर आमचे कुटुंब सावरू शकेल अशा आशयाचे पत्र व आजाराबाबतचे रुग्णालयातील रिपोर्ट सादर केले होते. तरीदेखील अद्यापपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाला पाझर फुटला नाही. जाधव कुटुंबीय सध्या मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहे. वामन जाधव यांनी पेन्शन योजना, जीपीएफ व इतर बाबींची पूर्तता करून मला रक्कम अदा करण्यात यावी. सदर प्रकरणी एक महिना धीर धरून मी प्रशासनाची वाट पाहणार असून महिनाभरात प्रशासनाने कुठलीच हालचाल केली नाही, तर मी १५ जून रोजी कुटुंबियांचा निरोप घेऊन अज्ञातस्थळी जाऊन मृत्यूला कवटाळणार आहे, अशा प्रकारचे पत्र राज्यपाल, अण्णा हजारे, मानवी हक्क आयोग, लोकपाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले आहे. जाधव यांनी तर आता सर्व प्रकाराला कंटाळून ‘इच्छामरणाची’ परवानगी मागून आपली जीवनयात्रा संपविण्याचा विचार केला आहे. सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे उलटली तरी जिल्हा परिषद प्रशासन आपल्या कर्मचार्यांची बाजू ऐकू न घेत नसेल तर ती नोकरी काय कामाची, आयुष्यभर मरमर करून त्याचे फळ असे मिळत असेल तर अशा प्रशासनाचा धिक्कार, असे म्हणत जाधव यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहून ते ओक्साबोक्सी रडत होते.