मरणाने केली सुटका पण... धगधगत्या चितेला अचानक आलेल्या पुराने वेढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 02:37 PM2022-10-20T14:37:52+5:302022-10-20T14:38:46+5:30
कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील अंजना नदीच्या पात्रात धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले.
नाचनवेल (औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील एका महिलेचे निधन झाल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नदी पात्रातील उंच जागेवर अंत्यसंस्कार केले; परंतु काही वेळातच नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढल्याची घटना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.
नाचनवेल येथून जवळच असलेल्या आमदाबाद येथे स्वतंत्र अशी स्मशानभूमी विकसित केलेली नाही. गावाशेजारी असलेल्या अंजना नदीच्या पात्रालगतच मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. दोन वर्षांपूर्वी अंजना नदीला आलेल्या पुरामुळे या नदीलगतचा ग्रामस्थांना जाण्याचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे सध्या या भागात झालेल्या पावसामुळे नदीपात्र परिसरात सर्वत्र पाणी साचले आहे. या गावाला दोन महिन्यांपूर्वी स्मशानभूमी विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु सध्या पावसाळा असल्याने काम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर या गावातील शांताबाई गोटीराम बनकर (वय ८५ वर्षे) यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता नातेवाईक व ग्रामस्थांनी पाण्यातून जात अंजना नदीमध्ये उंच जागेवर अंत्यसंस्कार केले. चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली. त्यानंतर काही क्षणातच धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढली. मात्र मोठ्या शर्थीने नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने मृतदेह जळाला.
वरील भागात पाऊस झाल्याने वाढली पाणी पातळी
आमदाबाद येथील अंजना नदीच्या वरील भागात असलेल्या बिलदरी, कोळंबी, भारंबा आदी गावांच्या परिसरात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अंजना नदीच्या पाणी पातळीत बुधवारी सकाळी वाढ झाली. शिवाय आमदाबाद गावाशेजारी या नदीवर कोल्हापुरी बंधारा असल्यानेही नदीपात्रात पाणी तुंबते. याचा फटका अंत्यसंस्कारासाठी आलेल्या ग्रामस्थांना बसतो.