कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:23 AM2017-12-22T00:23:35+5:302017-12-22T00:23:40+5:30
कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेल्या विवाहितेला पानवडोद प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने तिचा गुरुवारी मृत्यू झाला. डॉक्टर व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाला असून डॉक्टर व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाण्यात केली आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेल्या विवाहितेला पानवडोद प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने तिचा गुरुवारी मृत्यू झाला. डॉक्टर व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाला असून डॉक्टर व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाण्यात केली आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
या घटनेत मरण पावलेल्या विवाहितेचे नाव उषाबाई नामदेव गव्हाणे (रा.बोदवड, ता.सिल्लोड) असे आहे. कुटुंब कल्याण शस्रक्रियेनंतर उषाबाई यांना त्रास होऊ लागला.
त्यावेळी दवाखान्यात उपचारासाठी कुणीही नव्हते. त्यामुळे तिच्या पतीने उषाबाईला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. ही घटना आरोग्य केंद्राच्या व्यवस्थापनाला समजल्यानंतर त्यांनी उषाबाईस बोलावून उपचार सुरु केले. पुन्हा उषाबाईला बुधवारी रात्रीपासून त्रास सुरु झाला.
गुरुवारी या महिलेचे टाके आरोग्य केंद्रात काढण्यात आले. त्यानंतर तिला उलट्या झाल्या. त्रास वाढल्याने तिला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच चिचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक संतापले.
इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी
डॉक्टर व त्यांच्या कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळेच उषाबाईचा मृत्यू झाल्याचा आरोप पती नामदेव गव्हाणे व नातेवाईकांनी केला आहे. ही घटना कळताच सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची गर्दी झाली. या प्रकरणी इन कॅमेरा शवविच्छेदन करावे, या मागणीवर नातेवाईक ठाम होते. सत्यता बाहेर यावी म्हणून गुरुवारी मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आला. मृत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गुन्हा दाखल झाला नाही म्हणून सदर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत.
यात डॉक्टर किंवा कर्मचाºयांचा दोष नाही. उषाबाईला अॅसिडीटी झाली होती. हृदयविकाराने तिचा मृत्यू झाला असावा, नातेवाईकांनी केलेले आरोप खोटे आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यावर खरे काय ते कळेल.
-डॉ. एम. एम. चोपडे
वैद्यकीय अधिकारी, पानवडोद