कुत्र्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:08 AM2018-07-17T01:08:19+5:302018-07-17T01:08:35+5:30
लासूरनजीकची घटना : पिकांचे संरक्षण करताना गमावला प्राण
लासूर स्टेशन : कपाशी पिकाचे हरणांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात गेलेल्या ७५ वर्षीय वृद्ध शेतकºयाचा दहा मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याने जागीच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी आठ वाजता गंगापूर तालुक्यातील एकबुर्जी वाघलगाव येथे घडली.
कप्पूसिंग बाळाराम काकरवाल (७५) असे या मयत शेतकºयाचे नाव आहे. कप्पूसिंग यांचे शेत गावाच्या उत्तरेला असून, तेथे ते सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतातील कपाशीचे हरणांपासून संरक्षण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात फिरत असलेल्या दहा मोकाट कुत्र्यांनी एकाचवेळी त्यांच्यावर हल्ला चढवून शरिराचे लचके तोडले. यात कप्पूसिंग यांचा जागीच मृत्यू झाला. तब्बल दीड तास हे थरारनाट्य सुरु होते. सकाळची वेळ असल्याने आरडाओरड करुनही बराच वेळ कुणी मदतीला आले नाही. नंतर जवळच रतन कोंडीराम बिघोत हे बैलांना चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांनी हे दृश्य पाहिले, परंतु तोपर्यंत कप्पूसिंग गतप्राण झाले होते. यापूर्वीही दोन वासरे व एका बकरीचा मोकाट कुत्र्यांनी फडशा पाडल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची संतप्त मागणी यावेळी गावकºयांनी केली. औरंगाबाद महानगरपालिकेने आणून सोडलेल्या कुत्र्यांनीच हा हल्ला केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.