विषबाधेमुळे बिबट्याचा मृत्यू, सिरसाळातांडाच्या डोंगरात आढळला मृतदेह
By Admin | Published: May 7, 2017 05:12 PM2017-05-07T17:12:33+5:302017-05-07T17:12:33+5:30
सिरसाळातांड्याच्या डोंगरात एका 3 वर्षीय (नर) बिबट्याचा मृतदेह आढळला असून, त्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा
श्यामकुमार पुरे/ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 7 - तालुक्यातील सिरसाळातांड्याच्या डोंगरात एका 3 वर्षीय (नर) बिबट्याचा मृतदेह आढळला असून, त्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय महाजन यांनी व्यक्त केला. या घटनेची माहिती एका नागरिकानं सोयगाव वनविभागाला फोनवरून दिली. पण तो बिबट्या कुठे मृत्युमुखी पडला, याची माहिती देण्यापूर्वीच त्यानी फोन बंद केला. यामुळे वन कर्मचाऱ्यांची फजिती झाली.
शुक्रवारी रात्रभर कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला असता अथक प्रयत्नानंतर शनिवारी सिरसाळातांड्याच्या डोंगरात शेख मारू टेकडीजवळ बिबट्याचा मृतदेह सापडला. 72 तासांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याने त्याचा मृतदेह आता सडण्यास सुरुवात झाली होती. सोयगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी काळे, आ. अब्दुल सत्तार, वनपाल खरात, वनरक्षक रामेश्वर साळवे, कोळी, बनसोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घाटनान्द्रा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय महाजन, पळशी येथील डॉ. बी.बी. गायकवाड़ यांनी त्याचे शवविच्छेदन केले. सदर बिबट्याचे सिरसाळातांडयाच्या डोंगरात अंतिम संस्कार करण्यात आल्याची माहिती वंनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी काळे यांनी दिली. सदर बिबट्या नर असून त्याचा 72 तासांपूर्वी झाला मृत्यू झाला आहे. पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आला नसला तरी विषबाधेमुळे त्या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय महाजन यांनी दिली आहे.
मृत्युमुखी पडलेला बिबट्या तंदुरुस्त होता. तो आजारी नव्हता. अन्न-पाण्यामुळे ही त्याचा मृत्यू झाला नसावा. एकंदरित लक्षणावरून काही तरी विषारी औषध खाण्यात आल्याने विषबाधेमुळे त्याचा मृत्यू झाला आहे, असेही वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय महाजन यांनी सांगितले.