पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 06:35 PM2019-04-26T18:35:40+5:302019-04-26T18:38:03+5:30
वाहनाच्या धडकेत मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने बिबट्याच्या मृत्यू झाला
कायगाव (औरंगाबाद ) : उन्हाचे चटके माणसांबरोबर वन्यजीवांनाही बसू लागले आहेत. अशात अन्न- पाण्याच्या शोधात हिंस्र प्राणी जंगल सोडून मानवी वस्त्याकडे भटकू लागल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी कायगावजवळ रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचामृत्यू झाला. औरंगाबाद- अहमदनगर राष्ट्रीय मार्गाजवळील कायगावजवळ कळंबीच्या ओढ्यानजीक ही घटना घडली.
शुक्रवारी सकाळी सात वाजता येथील अनिल निकम यांच्या शेतात कुत्रे जोरजोराने भुंकत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शेतात बारकाईने पाहणी केली. त्यावेळी त्यांना एक जखमी बिबट्या दिसून आला. वाहनाने धडक दिल्याने त्याच्या मानेला आणि मागच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. तात्काळ याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सहाय्यक वन सरंक्षक प्रशांत वरुडे, वन परिक्षेत्र अधिकारी ए.बी.गायके, वनपाल बी.पी.झोड, आर.एच. दारुंटे, एस.एन.नांगरे, बी.एस.चव्हाण, मुक्तार अली, एच.एच.सय्यद, बचाव पथक प्रमुख पी.आर अष्टेकर, वनरक्षक एस.बी.पवार, तय्यब पठाण आदी अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तपासणी करण्यात आली असता बिबट्या मृत पावल्याचे लक्षात आले.
मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी गंगापूर येथील सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. आर.ऐ.डवरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. उबाळे, डॉ. चामरगोरे यांनी घटनास्थळीच केली. सहाय्यक वन सरंक्षक अधिकारी वरुडे यांनी सांगितले की, बिबट्याला वाहनाच्या धडकेने मोठी दुखापत झाली होती.यामुळे मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत झाला.