धारकुंड धबधब्याखाली अंघोळ करताना पाय घसरून कुंडात पडलेल्या भाविकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:27 PM2024-08-27T13:27:36+5:302024-08-27T13:28:22+5:30
सोयगाव तालुक्यातील धारकुंड येथे तीनशे फुटांवरून धबधबा कोसळतो .
सोयगाव : धबधब्याखाली अंघोळ करताना कुंडात पाय घसरून पडल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२६) दुपारी एक वाजता सोयगाव तालुक्यातील धारेश्वर(धारकुंड) महादेव मंदिर परिसरात घडली. गजानन राघो माने(वय ३५, रा. केऱ्हाळा, ता. सिल्लोड) असे मृत भाविकाचे नाव आहे.
श्रावण महिन्यातील सोमवारनिमित्त तालुक्यातील धारेश्वर (धारकुंड) महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गजानन माने यांच्यासह काही मित्र आले होते. याच मंदिर परिसरात तीनशे फुटांवरून कोसळणारा धबधबा आहे. या धबधब्याखाली गजानन व त्यांचे मित्र अंघोळ करीत असताना दुपारी १ वाजता गजानन यांचा पाय घसरुन ते धबधब्याखालील कुंडात कोसळले. कुंडात मोठमोठ्या कपारी असल्याने गजानन यांना वाचविण्यात मित्रांना अपयश आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सोयगाव ठाण्याचे पोउनि. रज्जाक शेख, जमादार संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, विकास दुबेले यांनी घटनास्थळी धाव घेत काही तरुणांच्या मदतीने सायंकाळी ५ वाजता गजानन यांचा मृतदेह कुंडातून बाहेर काढला. गजानन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, तीन बहिणी, असा परिवार आहे. गजानन हे वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
कुंड धोकादायक
धारकुंड धारेश्वर येथील धबधब्याखाली कुंड असून, त्यालगत मोठमोठ्या कपारी आहेत. पहिल्या श्रावण सोमवारीदेखील जळगाव येथील गौरव किसन नेरकर (वय २०) या तरुणाचा या कुंडात पडून मृत्यू झाला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक कुंडाला जाळी बसविण्याची मागणी केली जात आहे. परंतु याकडे मंदिर प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे.