पैठण येथे जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू; पत्नीच्या खूनप्रकरणी भोगत होता शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:45 PM2023-01-19T18:45:15+5:302023-01-19T18:45:42+5:30
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील दिलीप नरसिंग सोनवणे हा कैदी हर्सूल येथील कारागृहात त्यांच्या पत्नीच्या खून प्रकरणात २२ जुलै २०१९ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
पैठण : येथील खुल्या कारागृहात पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका बंदिस्त कैद्याचा आजारपणाने ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. दिलीप नरसिंग सोनवणे (५२ वर्षे, रा. वसमत) असे मयत कैद्याचे नाव आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील दिलीप नरसिंग सोनवणे हा कैदी हर्सूल येथील कारागृहात त्यांच्या पत्नीच्या खून प्रकरणात २२ जुलै २०१९ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याच्या चांगल्या वर्तनामुळे हर्सूल कारागृहातून त्याला मे २०२० ला पैठणच्या खुले कारागृहात पाठवण्यात आले होते. कोरोनाकाळात दोन वर्षे तो पॅरोलवर सुटला होता. काही महिन्यांपासून तो सतत आजारी पडत होता. वैद्यकीय तपासणीत त्याला असह्य आजार जडल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्याच्यावर कारागृहात उपचार करण्यात येत होते. १६ जानेवारी रोजी सकाळी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कैदी दिलीप सोनवणे यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पैठणच्या सहायक न्यायाधीश अपर्णा रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक किशोर पवार, सपोनि प्रल्हाद मुंडे, नायब तहसीलदार गिरजा शंकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्रेत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची पैठण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.