स्वत:ला पेटवून तरुणीला मिठी मारलेल्या मुलाचा मृत्यू; दोघांनीही पोलिसांना दिले परस्परविरोधी जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:11 AM2022-11-22T09:11:43+5:302022-11-22T09:12:04+5:30

९० टक्के भाजलेल्या तरुणाचा सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास मृत्यू झाला.

Death of boy who set himself on fire and hugged young woman; Both gave diffrent statment to police | स्वत:ला पेटवून तरुणीला मिठी मारलेल्या मुलाचा मृत्यू; दोघांनीही पोलिसांना दिले परस्परविरोधी जबाब

स्वत:ला पेटवून तरुणीला मिठी मारलेल्या मुलाचा मृत्यू; दोघांनीही पोलिसांना दिले परस्परविरोधी जबाब

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत संशोधक तरुणीला कवटाळले. 

सदर घटना शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेतील बायोफिजिक्स विभागाच्या प्रयोगशाळेत सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. ९० टक्के भाजलेल्या तरुणाचा सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास मृत्यू झाला. तर तरुणी ४० टक्क्यांपेक्षा अधिक जळाल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

गजानन खुशालराव मुंडे (२९, ह.मु. पीएचडी वसतिगृह, विद्यापीठ, रा. दाबा दिग्रज, ता. जिंतूर, जि. परभणी) व पूजा कडूबा साळवे (२८, ह.मु. एन ७, रा. दहेगाव, ता. सिल्लोड) असे जळालेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; गजानन हा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशाेधन करतो, तर पूजा ही शासकीय विज्ञान संस्थेच्या बायोफिजिक्स विभागात संशोधन करते. दोघांचे मार्गदर्शक एकच आहेत.

चार दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात तक्रार

पूजाने १७ नोव्हेंबर रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात बहीण व भावजी- सोबत जाऊन गजानन त्रास देत असल्याची चार पानांची तक्रार नोंदवली होती. त्यापूर्वीही तिने गजाननच्या विरोधात बेगमपुरा ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. त्याशिवाय तो छेड काढत असल्याची तक्रार काही महिन्यांपूर्वी सिडको पोलिस ठाण्यातही नोंदवली. सिडको पोलिसांनी गजाननला ठाण्यात बोलावून घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

तरुणीने फसवणुक केली; तरुणाचा दावा

जळीत तरुणाच्या मृत्यूपूर्व जबाबानुसार त्याचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न केले असून, २ लाख ५० हजार रुपये त्याने तिच्यावर खर्च केले होते. मात्र, काही महिन्यांपासून तरुणी हे मान्य करण्यास तयार नव्हती. तिने फसवणूक करीत माझे जीवन उद्ध्वस्त केल्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने जाळून घेण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. त्यामध्ये सर्व घटनाक्रम नमूद असल्याचे निरीक्षक पोतदार यांनी सांगितले.

पोलिस तपासातून उलगडणार रहस्य-

जळीत तरुण-तरुणीने दिलेल्या परस्परविरोधी जबाबांमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दोघांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅट, डायरीतील नोंदी तपासल्यानंतरच घटनेतील रहस्य उलगडणार आहे.

Web Title: Death of boy who set himself on fire and hugged young woman; Both gave diffrent statment to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.