पतीचे निधन,सहा मुले त्यात पॅरालिसिसचा अटॅक; संकटाच्या काळरात्रीवर ‘मीरा’ची मात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:29 AM2023-10-16T11:29:26+5:302023-10-16T11:30:25+5:30
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी एका खाणावळीत पाेळ्या करण्याचे कामही केले.
छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील अप्रतिम हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या मीराबाई सुरेश जैस्वाल यांच्यावर आयुष्यात अनेक मोठमोठी संकटे येऊनही त्यांनी जिद्दीने पुन्हा उभारी घेतली. पतीचे निधन झाल्यावर मेसवर काम केले. पक्षाघाताचा झटका आल्यानंतरही पतीच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी संघर्ष केला. पाच मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांचे विवाह केले. मुलाला डॉक्टर केले. निवृत्तीनंतर आता मुलासोबत आनंदाने राहत आहेत.
फुलंब्री येथील मीराबाईंचे १९६९ मध्ये जळगाव जामोद येथील सुरेश जैस्वाल यांच्यासोबत लग्न झाले. पती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वालसावंगी येथे जि. प. शाळेत शिक्षक होते. मुलांच्या शिक्षणासाठी जैस्वाल दाम्पत्याने सिडको एन-६ भागात घर घेतले. मुली मनपा शाळेत शिक्षण घेत होत्या. दोन मुलींचे लग्न सुरेश जैस्वाल यांनी केले. २००० मध्ये अचानक हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. पतीचे निधन झाले तेव्हा मुलगा ऋषिकेश अवघ्या तीन वर्षांचा होता. येथूनच संकटांची मालिका सुरू झाली. गावाकडे पतीची शेती होती, त्यात काहीच वाटा मिळाला नाही. पतीच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून त्यांनी जि. प. कार्यालयाचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका खाणावळीत पाेळ्या करण्याचे कामही त्यांनी केले. त्यातच २००४ मध्ये मीराबाई यांना अर्धांगवायू झाला. मुली, मुलाचे शिक्षण सुरू होते. अशा परिस्थितीत न खचता त्यांनी आपला संघर्ष तीव्र केला. जि. प.मध्ये शिपाई म्हणून अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविली. शहरापासून ३५ किमी लांब कचनेर आरोग्य केंद्रात नेमणूक मिळाली. आजारपणातच रोज अपडाऊन केले. स्नेहा या मुलीला एएलबीपर्यंत शिक्षण दिले. मुलगा ऋषिकेश बीएचएमएस करून डॉक्टर झाला. बजाजनगर येथे त्याने स्वत:चे क्लिनिक सुरू केले. आता त्यांनी सातारा येथे मुलाच्या आग्रहाने रो-हाऊस घेतले.
संकटात धावून जाणारा भाचा
मीराबाई यांच्या संकटकाळात धावून येणारा म्हणजे त्यांच्या बहिणीचा मुलगा दिनेश आणि त्याची बायको सुनीता होय. मुलींसाठी स्थळ पाहण्यापासून लग्नापर्यंत तो खंबीरपणे पाठीशी उभा राहत होता. दिनेशचे आमच्या कुटुंबीयांवर मोठे ऋण असल्याचे त्यांच्या मुलीही पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात.