कोविड उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू; दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By सुमित डोळे | Published: September 22, 2023 08:27 PM2023-09-22T20:27:05+5:302023-09-22T20:27:20+5:30
. उपचारा दरम्यान निष्काळजीपणा करुन जातीयवाचक शिविगाळ केल्याचा ठपका
छत्रपती संभाजीनगर : कोरोना काळात बीएएमएस डॉक्टराने उघडलेल्या कोव्हिड सेंटर मध्ये रुग्णाच्या मृत्यूप्रकरणात मुकूंदवाडीच्या आशिर्वाद रुग्णालयाच्या डॉ. बी. डी. गोंगे पाटील, पत्नी अंजली यांच्यावर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारा दरम्यान निष्काळजीपणा करुन जातीयवाचक शिविगाळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
उस्मानपुऱ्यातील रहिवासी अॅड. संतोष पांडुरंग गायकवाड (३४) व त्यांचे वडिल पांडुरंग यांना जुन, २०२१ मध्ये कोरोनाची बाधा झाली होती. आशिर्वाद रुग्णालयात काम करणारा कपिल लांडगे ने त्यांना गोंगेच्या रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. अजय गायकवाड यांनी त्यानंतर भाऊ संतोष व वडिल पांडुरंग यांना गाेंगे यांच्या रुग्णालयात दाखल केले. १० जुन रोजी मात्र संतोष यांची प्रकृती खालावल्याने कुटूंबाने गोंगे ला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता गोंगे ने उलट त्यांनाच जास्त शहाणपणा करु नका, मला काय करायचे ते माहित आहे, असे म्हणत नसेल विश्वास तर घेऊन जा दुसरीकडे, असे प्रत्यत्तर दिले. ११ जुन रोजी मात्र दुपारी संतोष यांचा श्वसनप्रक्रिया थांबल्यानंतर गोंगे ने हात वर करुन घाटी रुग्णालयात पाठवले. तोपर्यंत मात्र, संतोष यांचा मृत्यू झालेला होता.
उपचारांचे कागदपत्रे देण्यास नकार
भावाच्या मृत्यूनंतर अर्जुन यांनी गोंगेला उपचारा विषयी माहिती विचारली. तेव्हा त्याने उपचाराचे कागदपत्र देण्यास नकार दिला. गायकवाड यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर वैद्यकिय समितीच्या चौकशीत गोंगे ला कोव्हिड सेंटर चालवण्याची कुठलीच मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय, तो बीएएमएस असताना त्याने कोव्हिड सेंटर उघडले. त्यातच निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोपही कुटूंबाने केला आहे.
समितीचा अहवाल, चौकशी सुरू
वैद्यकिय समितीचा या तक्रारीबाबत सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच कुटूंबाने जातीयवाचक शिविगाळ केल्याचा आरोप केल्याने अॅट्रॉसिटीचे कलमही लावण्यात आले आहे. समितीच अहवाल व अन्य पुराव्यांचा तपास सुरू आहे, असे तपास अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले.