ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू; महापालिकेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड

By मुजीब देवणीकर | Published: June 3, 2024 01:09 PM2024-06-03T13:09:57+5:302024-06-03T13:15:36+5:30

मुकुंदनगर-राजनगर येथील धक्कादायक घटना, नागरिकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला.

Death of youth after falling into drainage ditch; The laxity of the municipal corporation is once again exposed | ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू; महापालिकेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू; महापालिकेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदनगर-राजनगर भागात विमानतळाच्या भिंतीलगत महापालिकेच्या ड्रेनेजची ४५० मिमी व्यासाची मोठी ड्रेनेज लाइन जाते. ही ड्रेनेज लाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहू लागले. महापालिकेने ड्रेनेज लाइन दुरुस्त न करता बाजूला मोठा खड्डा करून पाणी सोडून दिले. या खड्ड्यात रविवारी दुपारी बकऱ्या चारणारा २१ वर्षीय नागेश नवनाथ गायकवाड याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आसपासच्या नागरिकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला.

मुकुंदनगर भागात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या नवनाथ गायकवाड यांना दोन मुले, तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. त्याचा मोठा मुलगा नागेश रविवारी नेहमीप्रमाणे विमानतळाच्या भिंतीलगत रेल्वेच्या लोखंडी पुलाजवळ बकऱ्या चारत होता. त्याच्या बकऱ्यांच्या मागे एक कुत्रा लागला होता. नागेश काठी घेऊन पळत आला. तुटलेल्या भिंतीच्या बाजूला मातीसदृश्य खड्डा दिसला. त्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा त्याने प्रयत्न केला. पण तो ड्रेनेजच्या १५ फूट खोल पाण्यात पडला. त्याने वर येण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, गाळातून बाहेर येऊ शकला नाही. आसपासच्या तरुणांनी आरडाओरड सुरू केली. अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. एका तासानंतर अग्निशमन दलाचे जवान आले. त्यांनी गळ टाकून मृतदेह बाहेर काढला. तोपर्यंत शेकडो नागरिक जमा झाले होते. मृतदेह आधी चिकलठाणा येथील मिनी घाटीत व नंतर उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला गेला.

ड्रेनेजचे पाणी खड्ड्यात का?
घटनास्थळापासून अवघ्या पाचशे फुटांवर सिडकोने बांधलेला व सध्या मनपाकडे हस्तांतरित झालेला एसटीपी प्लांट आहे. या एसटीपी प्लांटला ४५० मिमी व्यासाची जलवाहिनी जात होती. अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाइन दोन ठिकाणी फुटली. ते पाणी बाहेर येऊ लागल्याने महापालिकेच्या सुपीक डोक्याच्या कर्मचाऱ्यांनी बाजूला मोठा खड्डा केला. त्यात पाणी सोडून दिले. ड्रेनेजची काही वर्षांपूर्वीच दुरूस्ती केली असती तर ही घटनाच घडली नसती, असे या भागातील संतप्त नागरिकांचे म्हणणे होते.

दोषींवर गुन्हे नोंदवा
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मानवीय चुकीमुळे निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला. महापालिकेला ही चूक टाळता आली असती. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत.
- राहुल निकम, प्रत्यक्षदर्शी कार्यकर्ता.

नागेशच्या मृत्यूला जबाबदार कोण?
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ही घटना घडली. नागेशच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येतोय.

घटनेची नेमकी माहिती घेऊ
ड्रेनेज विभागाचे कर्मचारी, अधिकारी १५ दिवसांपूर्वीच ड्रेनेज लाइन फुटल्याचे सांगत आहेत. दुरुस्तीसाठी कामही सुरू केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नेमकी अधिक माहिती घेऊन सांगता येईल.
- ए. बी. देशमुख, शहर अभियंता, मनपा.

दहा लाखांच्या मदतीची मागणी
कुटुंबातील कर्ता मुलगा मनपाच्या हलगर्जीपणामुळे गेला. महापालिकेने तातडीने कुटुंबियांना दहा लाखांची मदत द्यावी. कुटुंबियांपैकी एकाला मनपात नोकरी द्यावी, अशी मागणी काॅंग्रेसचे माजी गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी केली.

Web Title: Death of youth after falling into drainage ditch; The laxity of the municipal corporation is once again exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.