मुरमी येथे बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:05 AM2021-01-15T04:05:57+5:302021-01-15T04:05:57+5:30
ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होणार असल्यामुळे पोलीस प्रशासनाने मतदान केंद्रावर गुरुवारपासूनच पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस मुख्यालयातील ...
ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होणार असल्यामुळे पोलीस प्रशासनाने मतदान केंद्रावर गुरुवारपासूनच पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक संजय वामन इंगळे (बक्कल नं.९१६ , रा. सिडको पोलीस क्वार्टर) यांना मुरमी येथील मतदान केंद्रावर तैनात केले होते. मुरमी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पोना. संजय इंगळे हजर झाले. त्यानंतर काही वेळाने पोना. इंगळे यांनी पोलीस पाटील सुभाष साखरे यांना चक्कर येत असल्याचे सांगत पांघरण्यासाठी शाल मागितली. काही वेळातच इंगळे बेशुद्ध पडल्याने घाबरलेल्या साखरे यांनी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना ही माहिती दिली. पोलीस निरीक्षक गुरमे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.
प्रयत्न व्यर्थ ठरले
साखरे यांनी केंद्रावरील इतर कर्मचारी व कोतवाल लक्ष्मण जगधणे यांच्या मदतीने इंगळे यांना कारमध्ये टाकून रुग्णालयाकडे निघाले होते. इसारवाडी फाट्यावर पोलीस निरीक्षक गुरमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोना. इंगळे यांना पोलिसांच्या वाहनातून ठाण्यापर्यंत आणले. यानंतर रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
फोटो- संजय इंगळे (मयत पोलीस कर्मचारी)
---------------------