‘ रेणू’ च्या याही नवजात बछड्यांचा मृत्यू

By Admin | Published: September 12, 2016 11:15 PM2016-09-12T23:15:16+5:302016-09-12T23:23:32+5:30

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील बिबट्या ‘रेणू’ने शनिवारी सकाळी दोन गोंडस बछड्यांना जन्म दिला होता.

The death of these newborn pests of 'molecule' | ‘ रेणू’ च्या याही नवजात बछड्यांचा मृत्यू

‘ रेणू’ च्या याही नवजात बछड्यांचा मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील बिबट्या ‘रेणू’ने शनिवारी सकाळी दोन गोंडस बछड्यांना जन्म दिला होता. अवघ्या ४८ तासांमध्ये दोन्ही बछड्यांचा मृत्यू झाला. बछड्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रयोगशाळेसह हैदराबाद येथील मोठ्या प्रयोगशाळेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रेणू’ने चौथ्या वेळेस बछड्यांना जन्म दिला. चारही वेळेस बछड्यांचा मृत्यू झाला. हेमलकसा येथे दोनदा अशी घटना घडली. मात्र, आमटे कुटुंबियांनी मनपाला ही बाब सांगितलीच नाही.
१६ फेबु्रवारी २०१६ रोजी महापालिकेने गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथून रेणू आणि राजा या बिबट्याची जोडी आणली. रेणू गरोदर आहे, हेसुद्धा मनपाच्या डॉक्टरांना सांगण्यात आले नव्हते. हेमलकसा येथून आल्यापासून रेणू अस्वस्थ होती. महापालिकेच्या डॉक्टरांनी तिला गॅस्ट्रो झाला असेल म्हणून औषधोपचार सुरू केले. दरम्यान, ९ मार्च रोजी रेणूने अचानक तीन बछड्यांना जन्म दिला. अशक्त बछड्यांना जिवंत ठेवण्यासाठी मनपाने बरेच प्रयत्न केले. २४ तासांत दोन तर ४८ तासांत तिसऱ्या बछड्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. महापालिकेने या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून तत्कालीन प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
दरम्यान, रेणू तीन महिन्यांनंतर पुन्हा गरोदर झाली. मनपातील तज्ज्ञ डॉ. खाजा इनामदार, प्रभारी संचालक विजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेणूची भरपूर काळजी घेणे सुरू केले. तिच्या औषधोपचारात कोणतीच कसर सोडली नाही. ९० दिवसांच्या गरोदरपणानंतर शनिवारी सकाळी १० वाजता रेणूने दोन गोंडस बछड्यांना जन्म दिला. या घटनेने पुन्हा एकदा सिद्धार्थ उद्यानात पाळणा हलला होता. जिकडे तिकडे आनंदी वातावरण पसरले होते. रेणूने बछड्यांना दूध पाजणेही सुरू ठेवले होते. मागील दोन दिवसांपासून रेणू बछड्यांसोबत मस्त खेळत होती. रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत रेणूचे दोन्ही बछडे अत्यंत ठणठणीत होते. पहाटे ४.३० वाजता दोन्ही बछड्यांनी माना टाकल्या होत्या. या घटनेने प्राणिसंग्रहालयात पहाटेच भूकंप आला. बछड्यांना बाहेर काढून पाहिले असता दोन्हीही मरण पावले होते.
अनुवंशिक तथा गुणसूत्रांचा दोष
औरंगाबादेत आणण्यापूर्वी रेणूने हेमलकसा येथे असताना दोनदा बछड्यांना जन्म दिला होता. पहिल्यांदा रेणूने चार बछड्यांना जन्म दिला होता. दुसऱ्यांदा किती बछड्यांना जन्म दिला याची इत्थंभूत माहिती आमटे कुटुंबियांनी महापालिकेला दिली नाही. रेणूवर उपचार करणाऱ्या डॉ. इनामदार यांनी सांगितले की, रेणूमध्ये अनुवंशिक गंभीर आजार असण्याची शक्यता आहे. बछड्यांच्या जन्मानंतर ४८ तासांमध्ये ते मरत आहेत. चौथ्या वेळेस म्हणजे आता रेणूच्या पहिल्या बछड्याचे वजन ६०० ग्रॅम, दुसऱ्याचे ५०० ग्रॅम होते. त्यांच्या पचनशक्तीमध्ये गंभीर दोष निर्माण झाला. त्यांच्या अंगात ‘किटोन’च्या अंशाचे प्रमाण बरेच वाढले असावे, असे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रोग अन्वेषण प्रयोगशाळेची मदत
दोन्ही बछड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी खडकेश्वर येथील सहायक आयुक्त जी. एन. पांडे, पशुधन विकास अधिकारी बी. व्ही. देशमुख, रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहायक आयुक्त चंदेल, प्रभारी संचालक विजय पाटील, डॉ. व्ही. टी. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. नागापूरकर, वनपाल एस. आर. भांबळे, वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. शवविच्छेदनात अत्यावश्यक अवयव तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. स्थानिक प्रयोगशाळेचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. हैदराबाद येथील प्रयोगशाळेची मदतही घेण्यात येणार असल्याचे इनामदार यांनी नमूद केले.

Web Title: The death of these newborn pests of 'molecule'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.