भरधाव कारच्या धडकेने तृतीयपंथीयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:20 AM2017-11-26T00:20:19+5:302017-11-26T00:20:23+5:30
बीड बायपासवरील आदित्य हॉटेलसमोर उभ्या असलेल्या चार तृतीयपंथीयांना भरधाव कारने उडविले. या भीषण अपघातात एका तृतीयपंथीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तिघांवर घाटीत उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात शुक्रवारी (दि.२४) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बीड बायपासवरील आदित्य हॉटेलसमोर उभ्या असलेल्या चार तृतीयपंथीयांना भरधाव कारने उडविले. या भीषण अपघातात एका तृतीयपंथीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तिघांवर घाटीत उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात शुक्रवारी (दि.२४) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
राजू हरीशचंद्र लोहाडे (३८, रा. चित्तेपिंपळ्गाव) असे अपघातातील मयताचे नाव आहे. रोहन सांळुखे, मुकेश कदम आणि मंदा जाधव अशी जखमींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे म्हणाले की, तृतीयपंथी राजू लोहाडे, रोहन साळुंखे, मुकेश कदम व मंदा जाधव हे शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील आदित्य हॉटेलसमोर उभे होते. यावेळी झाल्टा फाट्याकडून आलेल्या भरधाव कारने त्यांना उडविले.
हा अपघात एवढा भीषण होता की, राजू लोहाडे याच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अन्य तीन जण दूर फेकले गेले. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पुंडलिकनगर पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी राजू यास तपासून मृत घोषित केले. इतरांवर उपचार सुरू आहेत.
मयत राजू लोहाडे हा विवाहित असून त्याला मुलगा, पत्नी व आई-वडील असा परिवार होता. वर्षभरापासून तो तृतीयपंथीयाप्रमाणे साडी-ब्लाऊज परिधान करून फिरत असे. गेल्या काही दिवसांपासून तो तृतीय पंथीयांसोबतच राहत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.