खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; नातेवाईकांनी मृतदेह नेला थेट बांधकाम भवनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:39 PM2019-05-29T18:39:44+5:302019-05-29T18:41:27+5:30
ग्रामस्थांनी आंदोलन करत मृतदेह बांधकाम भवनात नेला
औरंगाबाद : बीड रस्त्यावरील निलजगाव ते घारदोनदरम्यान रस्त्याच्या बाजूला खड्ड्यामध्ये पडून सोमवारी खोडेगावातील एका ग्रामस्थाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह थेट औरंगाबादमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणला. ग्रामस्थांनी दीड तास ठिय्या आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली.
याबाबतची माहिती अशी की, बाबासाहेब भानुदास वीर (४५) हे दुचाकीवरून घरी जात असताना फुलंब्रीवाडी ते घारदोनदरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी खड्ड्यात पडले. याठिकाणी पुलाचे काम चालू आहे. पुलाचे काम चालू असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, पुलाचे काम चालू असल्याबाबत कोणताही फलक अथवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाही. वीर हे पुलाच्या ठिकाणाहून जात असताना त्यांना रात्रीच्या अंधारात पर्यायी मार्गाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळले. दुचाकी त्यांच्या अंगावर पडली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारात खड्ड्यात पडलेल्या वीर यांना कुणी पाहिले नाही. सकाळी रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांना अपघात झाल्याचे कळाल्यानंतर चिकलठाणा पोलीस तिथे धावले. चिकलठाणा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीला घाटीत पाठविला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले.
ग्रामस्थ संतप्त
वीर यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला. वीर यांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असल्याचा ठपका नातेवाईकांनी ठेवला. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी वीर यांचा मृतदेह नंतर थेट अदालत रोडवरील सार्वजनिक बांधकाम भवन येथे आणला. तिथे मुख्य अभियंत्यांच्या दालनासमोर नातेवाईकांनी बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणा देत किमान दीड तास ठिय्या आंदोलन केले. नंतर कार्यकारी अभियंता खं.तु. पाटील यांना नातेवाईकांनी निवेदन सादर केले. रस्त्याचे काम चालू असताना तिथे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या अपघातास ठेकेदार व अधिकारी कारणीभूत असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यापूर्वीही याच रस्त्यावरील खड्ड्यात तीन जण पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याठिकाणी फलक लावण्यासंबंधी आठ दिवसांआधी मागणी करण्यात आल्याचे यावेळी ग्रामस्थ म्हणाले. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा गंभीर प्रसंग ओढावल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा बळी
बाबासाहेब भानुदास वीर हे मेंढ्या चारायला लांझी (वाळूज परिसर) येथे होते. सोमवारी रोजी रात्री ते मोटारसायकलवरून खोडेगाव येथे घरी जाऊन येतो म्हणून लांझी येथून निघाले. मात्र, ते सकाळपर्यंत घरी आले नाहीत. ते १५ ते २० फूट खोल पुलाच्या खड्ड्यात जाऊन पडले. रात्र असल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते तेथेच मृत पावले. घारदोन येथील पोलीस पाटील तात्याराव वीर यांनी अपघाताची माहिती पोलीस ठाण्याला दिली.
बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
अपघातस्थळी पाहणी करून नि:पक्षपाती चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन बांधकाम विभागाच्या वतीने सहायक अधीक्षक अभियंत्यांनी लेखी पत्र दिल्यानंतरच नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड, नवनाथ तोगे, नारायण डिघुळे, बालाजी हुलसार, साईनाथ हुलसार, धोंडिबा वीर, काशीनाथ भावले, कारभारी वीर, विष्णू वीर, अर्जुन वीर, विष्णू निवृत्ती वीर, दिगंबर खुणे, एकनाथ वीर, तसेच अप्पासाहेब निर्मळ आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती. ४ग्रामस्थ बांधकाम भवनात आल्याचे कळताच खबरदारी म्हणून सहायक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक रोडे, विशेष शाखेचे निरीक्षक शेषराव उदार आदींसह पोलिसांचा ताफा बांधकाम विभागात दाखल झाला.