पाण्याच्या शोधातील वानराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:49 AM2019-05-24T00:49:20+5:302019-05-24T00:49:36+5:30
पाण्याच्या शोधात आलेल्या वानराचा रशीदपुरा येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली.
औरंगाबाद : जंगलांमध्ये पाणवठ्यांत पाणी नसल्याने वन्यप्राण्यांचा मोर्चा लोकवस्तीकडे वळत आहे. अशाच पाण्याच्या शोधात आलेल्या वानराचा रशीदपुरा येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदन केल्यानंतर या वानरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तापमानाचा पारा वाढल्याने पाण्याच्या शोधात वानर गुरुवारी शहरात आले. वीज प्रवाह असलेल्या उच्च दाबाच्या वाहिनीचा धक्का लागल्याने वानर खांबावरून खाली पडले. यातच त्याचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वन विभागाच्या वाहनातून मृत वानराला वन विभागात आणले. विविध वसाहतींत धोकादायक वीज प्रवाह असलेली तार काढून त्याठिकाणी भूमिगत जोडणी करून देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.