बेशुद्ध पडलेल्या कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 20:44 IST2019-05-02T20:44:04+5:302019-05-02T20:44:27+5:30
काम करताना उलटी होवून बेशुद्ध पडलेल्या ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील आदर्श मॅट कंपनीत कामगार दिनी उघडकीस आली.

बेशुद्ध पडलेल्या कामगाराचा मृत्यू
वाळूज महानगर : काम करताना उलटी होवून बेशुद्ध पडलेल्या ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील आदर्श मॅट कंपनीत कामगार दिनी उघडकीस आली. मृताच्या नातेवाईकांनी कंपनी मालकावर आरोप करीत रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात घेवून जाणारे वाहन अडवून तासभर पोलीस ठाण्यात रोखून धरले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी रुग्णास रुग्णालयात नेले. कुंडलिक तुळशीराम गाडेकर (४२, रा. नर्सरी कॉलनी रांजगणाव) असे मृताचे नाव आहे.
कुंडलिक गाडेकर हे पत्नी राधाबाई, एक मुलगी व एक मुलगा असे कुटुंबासह रांजणगाव येथे वास्तव्यास आहे. ते वाळूज एमआयडीसतील आदर्श मॅट कंपनीत मशिन आॅपरेटर म्हणून कामाला होते. ते मंगळवारी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला गेले. दरम्यान, काम करीत असताना रात्री ११:३० वाजेच्या सुमारास त्यांना अचानक उलट्या झाल्या. सहकाऱ्यांनी त्यांना पाणी पाजून कंपनीतील बाजूच्या खोलीत आराम करण्यास सांगितले. ते झोपी गेल्याचे पाहून कामाच्या व्यापात इतर कामगारांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
बुधवारी सकाळी सुटी झाल्यावर घरी जाताना कामगारांनी गाडेकर यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उठले नाही. कामगारांनी ही माहिती कंपनी मालक संजय कुलकर्णी यांना दिली. त्यानंतर कुलकर्णी यांनी गाडेकर यांच्या कुटुंबियांना बोलावून घेतले.
दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे फौजदार राहुल रोठे यांनी पथकासह घटनास्थळी धाव जात माहिती घेतली. व गाडेकर यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.