सामायिक घरावर परस्पर उचलले १ कोटी २० लाखाचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 03:42 PM2018-04-28T15:42:54+5:302018-04-28T15:44:21+5:30
सामायिक घर एकट्याचेच असल्याचे खोटे दस्त सिडको आणि बँकेला सादर करून १ कोटी २० लाख रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एका उद्योजकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
औरंगाबाद : सामायिक घर एकट्याचेच असल्याचे खोटे दस्त सिडको आणि बँकेला सादर करून १ कोटी २० लाख रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एका उद्योजकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
संदीप साहेबराव आग्रे (रा. टाऊन सेंटर, सिडको) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सिडको पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार लक्ष्मण परभतराव घुगे (६८, रा. टाऊन सेंटर, सिडको) यांनी आणि आरोेपीच्या वडिलांनी मिळून १९९२ साली सिडकोतील टाऊन सेंटर येथील २ हजार ८०० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता. भूखंडाचे क्षेत्रफळ तीन हजार चौरस फुटांपेक्षा कमी असल्याने सिडकोने या भूखंडाची वाटणी करून दिली नव्हती. परिणामी, दोघांच्या नावे असलेल्या या भूखंडावर घुगे आणि आग्रे यांच्या वडिलांनी एकत्रित घराचे बांधकाम केले. काही वर्षांनंतर आरोपीचे वडील मृत झाले. ३० डिसेंबर २००९ ते २५ मे २०१६ या कालावधीत आरोपी संदीप यांनी क्रांतीचौकातील एका बँकेकडे घर तारण ठेवून १ कोटी २० लाख रुपये कर्ज घेतले. ही बाब तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
या तक्रारीत म्हटले की, आरोपीने कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रात तक्रारदार यांच्या परस्पर त्यांच्या बनावट सह्या करून खोटी कागदपत्रे सिडको कार्यालय आणि बँकेत सादर केले. तसेच सामायिक घराची मूळ कागदपत्रे तक्रारदार यांच्या परस्पर बँकेत गहाण ठेवून परस्पर १ कोटी २० लाख रुपये कर्ज घेतले. घुगे हे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी तर आग्रे हे उद्योजक आहेत.याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलीस उपनिरीक्षक सी.बी. ठुबे यांच्याकडे तपास देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली.
कागदपत्रातील सह्यांची केली पडताळणी
या गुन्ह्याविषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक प्रजापती म्हणाले की, तक्रारीनुसार गुरुवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीच्या म्हणण्यानुसार बँकेने त्यांच्या स्वत:च्या घराचे मूल्यांकन दीड कोटी दाखविले होते. त्याआधारेच बँकेने आपल्याला कर्ज दिले. सामुदायिक बांधकाम झालेले असले तरी आम्ही आमच्याच वाट्याच्या घरावर कर्ज घेतले आहे. आरोपीने दोघांच्या संपूर्ण घरावर कर्ज घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला. कर्जसंबंधी बँकेकडील कागदपत्रे आणि सिडकोला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रातील सह्यांची पडताळणी केली जाईल, नंतरच या प्रकरणातील सत्यता समोर येईल.