राजकीय स्वार्थासाठी कर्ज मेळावा,कार्यकत्यांना कर्ज वाटप; खा. जलील यांचा मंत्री कराडांवर निशाना
By संतोष हिरेमठ | Published: September 5, 2022 06:54 PM2022-09-05T18:54:04+5:302022-09-05T18:55:53+5:30
सर्व बँका मंत्र्यांची गुलामगिरी करीत आहे.
औरंगाबाद : राजकीय स्वार्थासाठी कर्ज मेळावा घेतला जात असून, कार्यकर्त्यांना कर्जाचे वाटप केले जात आहे. वाटप केलेले कर्ज वसुलीही होणार नाही, असे म्हणत खा. इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यावर निशाना साधला.
खा. जलील म्हणाले, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत २ हजार ९०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप मेळावा घेतला. बँकर्स असोसिएशनने राजकीय दुकान चालविण्यासाठी असे मेळावा घेण्याला विरोध केला आहे. यापूर्वीही मंत्र्यांनी अशाप्रकारे कर्ज मेळावे घेतल्याचे बँकर्स असोसिएशनने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. राजकीय स्वार्थासाठी असे मेळावे घेतले जातात. कार्यकर्त्यांना कर्ज दिले जातात. सर्व बँका मंत्र्यांची गुलामगिरी करीत आहे. शिक्षणासाठी केवळ ६ टक्के कर्जाचे वाटप केले. कष्टकऱ्यांना कर्ज मिळत नाही. बँकेचे चेअरमन, एमडींनी यांनी बँका मजबूत होण्यासाठी, गाेरगरींबांना कर्ज मंजूर होईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वाटप होणाऱ्या २ हजार ९०० कोटी रुपयांच्या कर्जाची २० ते ३० टक्केही वसूली होणार नाही. कारण कार्यकर्त्यांनाच कर्ज दिले जाते. बँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मेळावा घेण्यात आला, असा आरोपही खा. जलील यांनी केला.