डोक्यावर कर्ज त्यात झाला तोटा; तरुण व्यावसायिकाची नैराश्यात गळफास घेऊन आत्महत्या
By राम शिनगारे | Published: November 24, 2022 07:22 PM2022-11-24T19:22:14+5:302022-11-24T19:22:30+5:30
उल्कानगरीतील घटना : जवाहरनगर ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल
औरंगाबाद : आरोग्यातील सर्जिकल वस्तूच्या डिलरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उल्कानगरीत उघडकीस आला. निलेश मोहन मंगळुरकर (३०, रा. प्लॉट नं. ३९, सुलोचना अपार्टमेंट, अलंकार हौसिंग सोसायटी, गारखेडा परिसर) असे गळफास घेतलेल्या अविवाहित तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश मंगळुरकर याचे उल्कानगरीत मधुरिका कॉम्पलेक्समध्ये दुकान आहे. त्या दुकानातुन तो शहरातील विविध डॉक्टरांना शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या वस्तुचा पुरवठा करीत होता. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास निलेश याच्या भावाने त्याला अनेकवेळा संपर्क साधला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शेवटी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास भावाने दुकान गाठले. तेव्हा दुकानाचे अर्धे शटर उघडे होते. भावाने आतमध्ये डोकावुन पाहताच त्यास निलेश याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तेव्हा त्याने जवाहरनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक निवृत्ती गायके, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर निलेश यास फासावरुन खाली उतरत घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
खाजगी बँकेचे ३० लाख कर्ज
निलेश याच्याकडे एका खाजगी बँकेचे तब्बल ३० ते ३५ लाख रुपये एवढे कर्ज होते. व्यावसायात होणारा तोटा आणि घेतलेल्या कर्जाचा मेळ बसत नसल्यामुळे तो अनेक दिवसांपासून तणावात होता. कुटुंबातील सदस्यांनाही त्याविषयी माहिती होती. गुरुवारी सायंकाळी निलेश हा फोन उचलत नसल्यामुळे भावाने तब्बल ७० फोन केले. त्यानंतर कार्यालयात धाव घेतली. कर्जाच्या तणावातुनच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.